घेरडी पेट्रोल पंपावर स्वच्छतागृह आणि पाण्याचा अभाव!
वाहनचालकांसह महिला प्रवाशांची गैरसोय; संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालण्याची मागणी

सांगोला विशेष प्रतिनिधी
विकास गंगणे
मो.9881583935
घेरडी येथील पेट्रोल पंपावर स्वच्छतागृहाची सुविधा आणि पिण्याच्या पाण्याची उपलब्धता नसल्यामुळे वाहनचालकांसह प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असल्याची तक्रार समोर येत आहे. विशेषतः महिला प्रवाशांना या समस्येचा अधिक त्रास सहन करावा लागत असून, पेट्रोल भरण्यासाठी थांबलेल्या ग्राहकांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याची नाराजी व्यक्त होत आहे.
पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना स्वच्छतागृह आणि पिण्याचे पाणी यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध असणे अपेक्षित आहे. मात्र, घेरडी येथील संबंधित पेट्रोल पंपावर या सुविधांचा अभाव असल्याने लांबचा प्रवास करणारे वाहनचालक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या कुटुंबांची गैरसोय होत आहे.
महिलांसाठी स्वच्छतागृहाची सुविधा अत्यंत महत्त्वाची असताना त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना महिला नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. तसेच पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने प्रवाशांना बाहेरून पाण्याची व्यवस्था करावी लागत आहे.
पेट्रोल पंपावर ग्राहकांकडून इंधनाचे पैसे घेतले जात असताना त्यांना आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधाही मिळाव्यात, अशी अपेक्षा वाहनचालकांकडून व्यक्त होत आहे. संबंधित पेट्रोल पंपाची जबाबदारी असलेल्या व्यवस्थापनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन स्वच्छतागृहाची योग्य व्यवस्था करावी, तसेच पिण्याच्या स्वच्छ पाण्याची सुविधा तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, संबंधित पेट्रोलियम कंपनीचे अधिकारी तसेच पुरवठा विभागाच्या सक्षम अधिकाऱ्यांनी घेरडी पेट्रोल पंपाची प्रत्यक्ष पाहणी करून उपलब्ध सुविधांची तपासणी करावी. नियमांनुसार आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याचे आढळल्यास संबंधित व्यवस्थापनाला योग्य त्या सूचना देऊन नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी वाहनचालक आणि महिला नागरिकांमधून होत आहे.
ग्राहकांना केवळ पेट्रोल-डिझेल विक्री नको, तर सुरक्षित आणि आवश्यक मूलभूत सुविधाही मिळायला हव्यात. आता संबंधित अधिकारी या तक्रारीची दखल घेऊन प्रत्यक्ष कारवाई करणार का, याकडे घेरडी परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.



