ताज्या घडामोडी

हप्त्यांच्या चर्चांनी परिसर ढवळला; पोलीस निरीक्षकांनी चौकशी करावी!

हप्त्यांच्या चर्चांना ऊत, कारवाई मात्र कागदावरच? पोलीस निरीक्षक नेमकी कोणती भूमिका घेणार? {भाग.नं.९}

सांगोला विशेष प्रतिनिधी : विकास गंगणे

मो.9881583935

 

सांगोला तालुक्यातील जवळा, घेरडी आणि परिसरातील विविध गावांमध्ये अवैध दारू विक्री, बेकायदेशीर वाळू उपसा, मटका तसेच इतर अवैध व्यवसाय सुरू असल्याची चर्चा नागरिकांमधून होत आहे. या प्रकारांमुळे गावातील सामाजिक वातावरण बिघडत असून, संबंधित यंत्रणांच्या कारवाईबाबत नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

 

विशेष म्हणजे, परिसरात अशा प्रकारचे व्यवसाय सुरू असल्याची माहिती संबंधित पोलीस यंत्रणांना नसावी का? माहिती असूनही ठोस कारवाई का होत नाही? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. अवैध व्यवसायांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणेने प्रत्यक्षात प्रभावी कारवाई करावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

 

दरम्यान, काही ठिकाणी अवैध दारू विक्री करणाऱ्यांकडून पैशांची मागणी होत असल्याच्या आणि पैसे न दिल्यास कारवाईची भीती दाखवली जात असल्याच्या तक्रारी व चर्चा नागरिकांमधून ऐकायला मिळत आहेत. मात्र, या कथित प्रकारांमध्ये तथ्य किती, याची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी स्वतंत्र चौकशी करणे आवश्यक आहे. अशा तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्यास सामान्य नागरिकांचा पोलीस यंत्रणेवरील विश्वास कमी होण्याची शक्यता आहे.

 

एकीकडे अवैध व्यवसायांवर कारवाई करण्याची जबाबदारी असताना दुसरीकडे अशा प्रकारांबाबत तक्रारी का निर्माण होत आहेत, याचा पोलीस निरीक्षकांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. घेरडी बीटमधील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची तपासणी करून त्यांच्या कार्यपद्धतीचा आढावा घ्यावा. तक्रारींमध्ये तथ्य आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

 

🛑पोलीस निरीक्षक साहेबांची भूमिका काय?🛑

 

जवळा-घेरडी परिसरातील अवैध दारू विक्री, वाळू उपसा आणि मटका व्यवसायांवर आळा घालण्यासाठी पोलीस निरीक्षक स्वतः पुढाकार घेणार का? संबंधित कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची चौकशी करणार का? तसेच अवैध व्यवसायांना कोणाचे अभय आहे का, याचीही निष्पक्ष चौकशी होणार का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

 

या गंभीर विषयाकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनीही लक्ष देण्याची गरज आहे. केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कारवाईसाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करणे आवश्यक आहे. परिसरातील नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावे आणि अवैध व्यवसायांना आळा बसावा, हीच सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.

 

आता या प्रकरणात पोलीस निरीक्षक कोणती भूमिका घेतात, वरिष्ठ अधिकारी चौकशीचे आदेश देतात का आणि अवैध व्यवसायांवर प्रत्यक्ष कारवाई होते का, याकडे जवळा-घेरडी परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

{ भाग.नं.१० उद्या सविस्तर वाचा}

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??