पोलिसांना जमले नाही, ते गावातील माजी सरपंच व तंटामुक्ती अध्यक्षांनी करून दाखवले!
डिकसळमधील दोन कुटुंबांतील बहिण-भावाचा वाद अखेर मिटला;

सांगोला विशेष प्रतिनिधी विकास गंगणे
मो.9881583935
सांगोला तालुक्यातील डिकसळ येथील एका वस्तीवर बहिण-भावामधील कौटुंबिक वाद चव्हाट्यावर आल्याने परिसरात चर्चेला उधाण आले होते. या वादाचे रूपांतर इतके वाढले की, दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. गेल्या महिन्यात या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी दाखल होऊन कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू झाली होती. त्यानंतर घेरडी बीटमधील पोलिसांना या वादाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी दोन्ही कुटुंबांमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी हा वाद मिटवण्यात यश आले नाही.
अखेर जे काम पोलिसांच्या प्रयत्नांनंतरही साध्य झाले नाही, ते काम गावातील माजी सरपंच आणि तंटामुक्ती अध्यक्ष यांच्या पुढाकारातून साध्य झाले. त्यांनी दोन्ही कुटुंबांशी संवाद साधत गैरसमज दूर करण्याचा आणि कौटुंबिक संबंध पुन्हा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मध्यस्थीला यश आले असून, दोन्ही कुटुंबांतील वादावर पडदा पडला आहे.
या वादामुळे काही काळ तणावाखाली असलेल्या दोन्ही कुटुंबांनी समेट झाल्यानंतर समाधान आणि आनंद व्यक्त केला आहे. गावातील प्रतिष्ठित व्यक्तींनी पुढाकार घेऊन नात्यांमधील कटुता दूर केल्याने संबंधित कुटुंबांकडून माजी सरपंच व तंटामुक्ती अध्यक्षांचे विशेष आभार मानले जात आहेत. तसेच ग्रामस्थांकडूनही त्यांच्या या सामाजिक कार्याचे कौतुक होत आहे.
दरम्यान, या घटनेच्या निमित्ताने घेरडी बीटमधील पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबतही परिसरात चर्चा सुरू झाली आहे. तक्रारी दाखल झाल्यानंतर बराच काळ या प्रकरणात ठोस समेटाचा प्रयत्न झाल्याचे दिसून आले नाही, अशी काही नागरिकांची भावना आहे. घेरडी बीटच्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये पोलिसांनी नागरिकांच्या तक्रारींची वेळेत दखल घेऊन संवेदनशील प्रकरणांमध्ये तत्परतेने हस्तक्षेप करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
पोलिसांवरील विश्वास टिकवण्याचे आव्हान!
गावागावांतील किरकोळ वाद वेळीच मिटवले गेले, तर मोठे वाद, पोलीस ठाण्यातील तक्रारी आणि न्यायालयीन प्रक्रियेचा त्रास टाळता येऊ शकतो. मात्र, काही प्रकरणांमध्ये पोलिसांकडून वेळेत प्रतिसाद मिळत नसल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे घेरडी बीटमधील पोलिसांनी नागरिकांशी संवाद वाढवून तक्रारींची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे.
डिकसळमधील या प्रकरणात गावातील माजी सरपंच आणि तंटामुक्ती अध्यक्षांनी केलेली मध्यस्थी निश्चितच कौतुकास्पद आहे.
कौटुंबिक नाती जोडण्याचे काम गावातील जबाबदार व्यक्तींनी केले, ही बाब सामाजिक सलोख्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरत आहे.



