दिवाळीतही सांगोला आगाराचा प्रवाशांना मनस्ताप; सायंकाळी ४ ची नराळे बस अचानक बंद!

सांगोला : विशेष प्रतिनिधी
विकास गंगणे
मो.9881583935
ऐन दिवाळीच्या सणासुदीच्या दिवसांत प्रवाशांची वर्दळ वाढलेली असताना सांगोला आगाराच्या सायंकाळी ४ वाजता सुटणाऱ्या नराळे बसने दांडी मारल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. दिवाळीनिमित्त खरेदी, नातेवाईकांच्या भेटीगाठी तसेच विविध कामांसाठी सांगोला येथे आलेल्या प्रवाशांना गावाकडे परत जाण्यासाठी बसची प्रतीक्षा करावी लागली. मात्र, निर्धारित वेळेत बस न आल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली.
याबाबत काही प्रवाशांनी सांगोला एसटी आगारात दूरध्वनीद्वारे संपर्क साधून बस का आली नाही, याची माहिती घेतली असता, संबंधित बस ही शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आली होती. सध्या शाळांना दिवाळीची सुट्टी असल्याने सायंकाळी ४ वाजताची नराळे बस बंद करण्यात आल्याची माहिती आगाराकडून देण्यात आल्याचे प्रवाशांनी सांगितले.
मात्र, शाळेला सुट्टी असली तरी सर्वसामान्य प्रवाशांची वाहतूक थांबत नाही. विशेषतः दिवाळीसारख्या मोठ्या सणाच्या काळात बाजारपेठेत खरेदीसाठी येणारे नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि नोकरदारांना गावाकडे जाण्यासाठी एसटी बसवर अवलंबून राहावे लागते. अशा परिस्थितीत पर्यायी बसची व्यवस्था न करता नियमित बससेवा बंद ठेवल्याने प्रवाशांची गैरसोय झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
शाळेला सुट्टी असल्याने विद्यार्थ्यांची संख्या कमी होऊ शकते, हे लक्षात घेऊन आगार प्रशासनाने प्रवाशांची गरज विचारात घेऊन पर्यायी नियोजन करणे अपेक्षित होते. दिवाळीच्या काळात प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता असतानाही बससेवा बंद ठेवण्याचा निर्णय नेमका कोणत्या नियोजनातून घेण्यात आला, असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
एसटी महामंडळ ही ग्रामीण भागातील नागरिकांसाठी महत्त्वाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे. त्यामुळे शाळेच्या वेळापत्रकानुसार बससेवा सुरू किंवा बंद करण्याबरोबरच सर्वसामान्य प्रवाशांच्या दैनंदिन गरजांचाही विचार होणे आवश्यक आहे. विशेषतः सणासुदीच्या काळात प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी अतिरिक्त किंवा पर्यायी बसची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.
आगारप्रमुखांनी लक्ष घालावे!
सांगोला आगार प्रशासनाने सायंकाळी ४ वाजताची नराळे बससेवा तातडीने पूर्ववत सुरू करावी. तसेच शाळांना सुट्टी असलेल्या काळातही ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय होणार नाही, यासाठी योग्य नियोजन करावे, अशी मागणी नराळे मार्गावरील प्रवाशांतून होत आहे. दिवाळीसारख्या सणाच्या काळात तरी एसटी प्रशासनाने प्रवाशांच्या अडचणींची दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



