ताज्या घडामोडी

दुय्यम निबंधक कार्यालयात एजंटांबाबत दुजाभावाची चर्चा; काहींना झुकते माप, तर काहींना प्रतीक्षा! ==================== भाग.नं.5

सांगोला विशेष प्रतिनिधी

मो.9881583935

 

सांगोला येथील दुय्यम निबंधक कार्यालयात जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारांसाठी येणाऱ्या नागरिकांची आणि शेतकऱ्यांची संख्या मोठी असते. मात्र, या कार्यालयातील काही कामकाजाच्या पद्धतीवरून सध्या विविध चर्चा सुरू असून, कार्यालयाशी अधिकृत संबंध नसलेल्या काही खासगी एजंटांना विशेष महत्त्व दिले जाते, तर इतर एजंटांना अथवा सामान्य नागरिकांना मात्र वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची चर्चा नागरिकांमधून होत आहे.

 

कार्यालयातील काही मर्जीतील एजंटांची कामे सहज मार्गी लागतात, तर इतरांना त्याच कामांसाठी वारंवार चकरा माराव्या लागतात, अशी भावना काही नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कार्यालयातील कामकाजात समानता आहे की व्यक्तीनिहाय वेगवेगळे निकष लावले जात आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

जमिनीच्या खरेदी-विक्रीसाठी येणारा शेतकरी हा आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा व्यवहार पूर्ण करण्यासाठी कार्यालयात येत असतो. अशा वेळी त्याला कोणत्याही खासगी व्यक्तीच्या मध्यस्थीशिवाय शासनाच्या नियमानुसार पारदर्शक सेवा मिळणे अपेक्षित आहे. मात्र, काही एजंटांना प्राधान्य मिळत असल्याची चर्चा खरी असेल, तर त्याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.

 

कार्यालयाशी कोणताही अधिकृत संबंध नसलेल्या खासगी व्यक्तींना कार्यालयीन कामकाजात कितपत हस्तक्षेप करता येतो? अशा व्यक्तींना कोणाच्या परवानगीने विशेष महत्त्व दिले जाते? सर्व नागरिकांसाठी एकसमान नियम लागू आहेत का? तसेच, दस्त नोंदणी प्रक्रियेत एजंटांची भूमिका नेमकी काय आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

 

*’एकाला तुपाशी, तर दुसऱ्याला उपाशी’ अशी परिस्थिती निर्माण होऊ नये!*

 

शासकीय कार्यालय हे सर्वसामान्य नागरिकांसाठी असून, तेथे कोणाचाही दबाव, मर्जी अथवा पक्षपात चालता कामा नये. कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रत्येक नागरिकाला समान वागणूक देणे गरजेचे आहे. त्यामुळे वरिष्ठ नोंदणी अधिकाऱ्यांनी सांगोला दुय्यम निबंधक कार्यालयातील कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी करून एजंटांच्या वाढत्या हस्तक्षेपाबाबत आणि कथित दुजाभावाबाबत वस्तुस्थिती तपासावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

 

संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी या चर्चेची दखल घेऊन पारदर्शक चौकशी करणार का? की सांगोला दुय्यम निबंधक कार्यालयातील हा कथित दुजाभाव असाच सुरू राहणार, याकडे शेतकरी व नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??