ताज्या घडामोडी

उजनीच्या पद्मावती मंदिरातील ६.४५ लाखांच्या दागिन्यांची चोरी उघड; फरार आरोपी वेळापूर पोलिसांच्या जाळ्यात

टेंभुर्णी पत्रकार अमोल मदने 

9767181216

 माढा तालुक्यातील मौजे उजनी येथील श्री पद्मावती देवी मंदिरातील ६ लाख ४५ हजार रुपयांच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या चोरी प्रकरणातील फरार आरोपीला पकडण्यात वेळापूर पोलिसांना यश आले आहे. कासलिंग बापू शिंदे (रा. काटी, ता. इंदापूर, जि. पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

 

*काय आहे प्रकरण?*

उजनी येथील पद्मावती देवीच्या मंदिरातील देवीच्या अंगावरील सोन्या-चांदीचे मौल्यवान दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेले होते. या प्रकरणी २४ जानेवारी २०२६ रोजी कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून मुख्य आरोपी कासलिंग शिंदे हा फरार होता.

 

असा लागला छडा –

आरोपी वेळापूर येथील वीज मंडळ कार्यालयाच्या पाठीमागील परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती वेळापूर पोलिसांना बातमीदारामार्फत मिळाली. माहिती मिळताच प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांनी पथकासह सापळा रचला.

 

पोलिसांना पाहताच आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे देत खोटी ओळख सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु सखोल चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

 

त्यानंतर वेळापूर पोलिसांनी आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी कुर्डुवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

 

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, अकलूज विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

 

या पथकात प्रभारी अधिकारी आ. पो. नि. आशिष कांबळे, पो. ना. नितीन लिंगडे, पो. शि. तानाजी पांढरे आणि चालक पो. ह. सुहिल पठाण यांनी सहभाग घेतला.

 

वेळापूर पोलिसांच्या या जलद कारवाईमुळे परिसरातून कौतुक होत आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??