ताज्या घडामोडी

छोट्या विक्रेत्यांवर कारवाई, मोठ्यांकडे दुर्लक्ष? नागरिकांचा पोलिसांना सवाल!

सांगोला विशेष प्रतिनिधी

विकास गंगणे 

मो.9881583935

 

जवळा-घेरडी परिसरात अवैध दारूविक्रीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असून, काही ठिकाणी कोणताही अधिकृत परवाना नसताना खोलीमध्ये टेबल मांडून दिवसभरापासून रात्री उशिरापर्यंत दारू विक्री व सेवनासाठी व्यवस्था केली जात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून व्यक्त होत आहेत. भरदिवसा सुरू होणारे हे व्यवहार रात्री एक वाजेपर्यंत सुरू असल्याचा आरोपही काही नागरिकांनी केला आहे.

 

विशेष म्हणजे, परिसरातील काही अवैध दारूविक्रीच्या ठिकाणांवर कारवाई होत असल्याचे दिसत असताना, काही ठिकाणी मात्र कारवाई होत नसल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे कारवाई करताना समान निकष लावले जातात का? काही विक्रेत्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

 

काही नागरिकांच्या म्हणण्यानुसार, मोठ्या प्रमाणावर अवैध दारूविक्री करणाऱ्या काही व्यक्तींचे स्थानिक पातळीवरील संबंधितांशी जवळचे संबंध असल्याची चर्चा आहे. मात्र या चर्चेमागील सत्यता अधिकृत चौकशीतूनच स्पष्ट होऊ शकते. तसेच पोलीस कर्मचाऱ्यांचे काही विक्रेत्यांशी कथित संबंध असल्याच्या चर्चांनाही नागरिकांनी चौकशीची मागणी करत प्रश्न उपस्थित केले आहेत. या संदर्भात कोणताही ठोस पुरावा समोर आलेला नसल्याने संबंधितांवर निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही.

 

🛑मोठ्या विक्रेत्यांना अभय आणि छोट्या विक्रेत्यांवर कारवाई?🛑

 

अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर कारवाई करताना मोठे आणि छोटे विक्रेते असा भेदभाव होत असल्याची भावना काही नागरिक व्यक्त करीत आहेत. एखाद्या ठिकाणी कारवाई होते, तर दुसऱ्या ठिकाणी कथितपणे दीर्घकाळ व्यवसाय सुरू राहतो, यामागचे नेमके कारण काय? संबंधित विभागाकडून याची तपासणी होणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

 

🛑हप्त्यांच्या चर्चेचीही चौकशी व्हावी🛑

 

काही नागरिकांमध्ये अवैध दारूविक्रीच्या व्यवहारांशी संबंधित आर्थिक देवाणघेवाणीबाबतही चर्चा आहे. 

 

अवैध दारूविक्रीमुळे सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था आणि तरुण पिढीवर होणारे संभाव्य परिणाम लक्षात घेता, जवळा-घेरडी परिसरातील संशयित ठिकाणांची तपासणी करणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

 

🛑आता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीच लक्ष घालण्याची गरज!🛑

 

जवळा-घेरडी परिसरात परवानगी नसताना दारू विक्री व सेवनासाठी जागा उपलब्ध करून दिली जात असल्याच्या तक्रारींची प्रत्यक्ष पाहणी होणार का? संबंधित ठिकाणांचे परवाने तपासले जाणार का? तसेच कारवाईत कथित दुजाभाव होत असल्याच्या तक्रारींची स्वतंत्र चौकशी होणार का?

 

या प्रश्नांची उत्तरे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी द्यावीत, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. केवळ छोट्या विक्रेत्यांवर कारवाई न करता, अवैध व्यवसायात सहभागी असल्याचे आढळणाऱ्या प्रत्येकावर कायद्यानुसार समान कारवाई व्हावी, हीच परिसरातील नागरिकांची अपेक्षा आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??