ताज्या घडामोडी

सांगोल्यात सौरऊर्जा प्रकल्पांना चोरट्यांचा फटका; हजारो मीटर केबल लंपास!

राजुरी परिसरातील दोन कंपन्यांमधून 19 हजार 280 मीटर डीसी केबल चोरी; 2 लाख 36 हजारांचे नुकसान, अज्ञात चोरट्यांविरुद्ध तक्रार

सांगोला विशेष प्रतिनिधी : विकास गंगणे

मो.9881583935

 

 

सांगोला तालुक्यातील राजुरी परिसरात सौरऊर्जा प्रकल्पांना चोरट्यांनी लक्ष्य केल्याची घटना समोर आली आहे. निवा इकोटेक प्रा. लि. कंपनीच्या साईटवरून तसेच शेजारील सनस्ट्रिम ग्रीन एनर्जी प्रा. लि. कंपनीच्या प्रकल्पातून एकूण 19 हजार 280 मीटर डीसी केबल चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरातील सौरऊर्जा प्रकल्पांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

 

याबाबत निवा इकोटेक प्रा. लि. कंपनीमध्ये अॅडमिन पदावर कार्यरत असलेले महेश प्रल्हाद पाटील (वय 32, रा. बोरगाव, ता. तासगाव, जि. सांगली, सध्या सांगोला) यांनी सांगोला पोलीस ठाण्यात 24 नोव्हेंबर 2026 रोजी फिर्याद दिली आहे.

 

फिर्यादीत नमूद केल्यानुसार, 17 नोव्हेंबर रोजी सकाळी कंपनीच्या राजुरी येथील साईटवरील इंजिनिअर गणेश दोडकुले आणि विक्रम चव्हाण यांनी कॉम्प्युटरवर वीज निर्मिती कमी होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर प्रत्यक्ष साईटवर पाहणी केली असता अॅक्सिस विंड एनर्जी प्रा. लि. कंपनीच्या एका इन्व्हर्टरची डीसी केबल कापलेली, तसेच कंड्युट पाईप उखडलेला आढळला. पुढे पाहणी केली असता आर्या स्टिल्स रोलिंग इंडिया प्रा. लि. कंपनीच्या इन्व्हर्टरच्या केबलही कापलेल्या दिसून आल्या. तपासणीदरम्यान एकूण नऊ इन्व्हर्टरच्या केबल कापल्याचे निदर्शनास आले.

 

घटनेची माहिती मिळताच महेश पाटील यांनी साईटवर धाव घेत सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये रात्री सुमारे 1 वाजून 33 मिनिटांच्या सुमारास काही अज्ञात व्यक्ती कंपनीच्या साईटवरील केबल खांद्यावर घेऊन जात असल्याचे दिसून आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर कंपनीच्या सुरक्षा विभागातील भारत कृष्णा काटे यांना बोलावून परिसरात केबलचा शोध घेण्यात आला; मात्र चोरीला गेलेला मुद्देमाल मिळून आला नाही.

 

या चोरीमध्ये अॅक्सिस विंड एनर्जी प्रा. लि. कंपनीची सुमारे 36 हजार रुपये किमतीची 1,800 मीटर डीसी केबल, तर आर्या स्टिल्स रोलिंग इंडिया प्रा. लि. कंपनीची सुमारे 2 लाख रुपये किमतीची 10 हजार मीटर डीसी केबल चोरीला गेल्याचे तक्रारीत नमूद आहे. अशा प्रकारे या दोन कंपन्यांचे मिळून 11 हजार 800 मीटर केबल चोरीला गेले असून, अंदाजे 2 लाख 36 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

 

दरम्यान, 22 नोव्हेंबर रोजी निवा इकोटेक कंपनीपासून साधारण अर्धा ते एक किलोमीटर अंतरावर असलेल्या सनस्ट्रिम ग्रीन एनर्जी प्रा. लि. कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर आणखी एक चोरीचा प्रकार समोर आला. या कंपनीच्या उदनवाडी ब्लॉक क्रमांक दोन व तीन, राजुरी परिसरातील प्रकल्पातून तब्बल 7,480 मीटर डीसी केबल चोरीला गेल्याची माहिती कंपनीचे अधिकारी किशोर सुभाष पाटील यांनी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

 

*एकाच परिसरातील दोन सौरऊर्जा प्रकल्पांमधून हजारो मीटर केबल चोरीला गेल्याने या घटनांमागे एकाच टोळीचा हात आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये अज्ञात व्यक्ती दिसत असल्याने पोलिसांच्या तपासातून चोरट्यांचा शोध लागणार का, तसेच चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत होणार का, याकडे संबंधित कंपन्यांचे लक्ष लागले आहे.

 

सौरऊर्जा प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात उपकरणे व केबल बसवण्यात येत असताना अशा प्रकारच्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याची गरज व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??