ताज्या घडामोडी

हंगिरगे तलाठी कार्यालयात तलाठ्यांच्या अनुपस्थितीचा प्रश्न ऐरणीवर; शेतकऱ्यांचे हेलपाटे वाढले!

सांगोला विशेष प्रतिनिधी : विकास गंगणे

मो.9881583935

 

सांगोला तालुक्यातील हंगिरगे येथील तलाठी कार्यालयातील कामकाजाबाबत शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. तलाठी कार्यालयात वेळेत उपस्थित राहत नसल्याने तसेच गावातील नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रातही नियमितपणे उपलब्ध होत नसल्याची तक्रार काही शेतकऱ्यांकडून केली जात आहे. त्यामुळे सातबारा उतारा, फेरफार नोंदी, पीक पाहणी, विविध दाखले आणि इतर महसुली कामांसाठी शेतकऱ्यांना वारंवार कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागत असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

महसूल विभागाच्या कामकाजात पारदर्शकता आणि नागरिकांना वेळेत सेवा मिळणे अपेक्षित असताना, तलाठी उपलब्ध नसल्यामुळे सामान्य शेतकऱ्यांची गैरसोय होत असल्याची भावना व्यक्त होत आहे. तलाठ्यांचा चालू मोबाईल क्रमांक कार्यालयात तसेच ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध असावा, जेणेकरून शेतकऱ्यांना आवश्यक कामासाठी संपर्क साधता येईल, अशी मागणी होत आहे.

 

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तलाठ्यांनी आपल्या नेमून दिलेल्या सज्जामध्ये नियमित उपस्थित राहण्याबाबत तसेच सुट्टीच्या दिवशीही मुख्यालयी किंवा नियोजित क्षेत्रात उपलब्ध राहण्याबाबत निर्देश दिल्याचे सांगितले जाते. मात्र, हंगिरगे येथील तलाठ्यांच्या उपस्थितीबाबत शेतकऱ्यांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सुट्टीच्या दिवशी तर सोडाच, इतर कामकाजाच्या दिवशीही तलाठी नेमून दिलेल्या भागात उपलब्ध नसल्याचा आरोप काही नागरिकांकडून केला जात आहे.

 

दरम्यान, हंगिरगे परिसरातून वाळूची वाहतूक होत असल्याचीही स्थानिक पातळीवर चर्चा सुरू आहे. या वाहतुकीबाबत नेमकी वस्तुस्थिती काय, वाहतुकीसाठी आवश्यक परवानग्या आहेत का आणि संबंधित यंत्रणेकडून तपासणी केली जाते का, याची महसूल विभागाने पडताळणी करणे आवश्यक आहे. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर तलाठी आणि महसूल यंत्रणेच्या कार्यपद्धतीबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित होत आहेत.

 

**तहसीलदार साहेब कोणती भूमिका घेणार?**

 

हंगिरगे तलाठी कार्यालयातील उपस्थिती, शेतकऱ्यांची गैरसोय, संपर्कासाठी चालू मोबाईल क्रमांक आणि परिसरातील वाळू वाहतुकीची चर्चा या सर्व बाबींची सांगोला तहसीलदारांनी दखल घेण्याची मागणी होत आहे. संबंधित तलाठ्यांच्या उपस्थितीची तपासणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, कार्यालयीन वेळापत्रक जाहीर करावे आणि शेतकऱ्यांना वेळेत महसुली सेवा मिळण्यासाठी योग्य व्यवस्था करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

 

आता या तक्रारींची तहसीलदार कितपत दखल घेणार आणि हंगिरगेतील शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयाच्या हेलपाट्यांतून दिलासा मिळणार का, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??