तुकडेबंदी कायद्याचे नियम असताना सांगोल्यात ग्रीन झोनमधील दस्त नोंदणी कशी झाली? भाग.नं.८

सांगोला विशेष प्रतिनिधी
विकास गंगणे
मो.9881583935
सांगोला नगरपरिषदेच्या हद्दीतील ग्रीन झोनमध्ये समाविष्ट असलेल्या जमिनींच्या खरेदी-विक्रीच्या दस्तांबाबत सध्या शहरात विविध चर्चा सुरू असल्याचे चित्र आहे. तुकडेबंदी कायद्याच्या तरतुदी लागू असताना संबंधित जमिनींचे दस्त नेमके कोणत्या नियमांच्या आधारे तयार करण्यात आले आणि त्यांची नोंदणी कोणत्या कागदपत्रांच्या आधारे झाली, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
विशेष म्हणजे, या व्यवहारांबाबत संबंधित कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता समाधानकारक माहिती मिळत नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. काही नागरिकांच्या म्हणण्यानुसार, स्पष्ट माहिती देण्याऐवजी उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने या व्यवहारांबाबत संशय आणि संभ्रम वाढत आहे.
खासगी एजंटांची भूमिका नेमकी काय?
दुय्यम निबंधक कार्यालयातील काही खासगी एजंटांच्या माध्यमातून जमिनींच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार केले जात असल्याची चर्चा आहे. कार्यालयात होणाऱ्या कथित वाटाघाटी, एजंटांची मध्यस्थी आणि संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका याबाबतही नागरिकांकडून प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र,
तुकडेबंदी कायदा असताना दस्तांना मंजुरी कशी?
तुकडेबंदी कायद्याच्या तरतुदींच्या पार्श्वभूमीवर ग्रीन झोनमधील जमिनींचे क्षेत्रफळ, जमिनीचा नियोजन विभागातील दर्जा, मंजूर अभिन्यास, अकृषिक परवानगी आणि संबंधित व्यवहाराची कायदेशीर पात्रता तपासणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत संबंधित दस्तांची नोंदणी कोणत्या कायदेशीर आधारावर करण्यात आली, याची स्पष्टता प्रशासनाने देण्याची गरज आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करावी
या संपूर्ण प्रकरणाची जिल्हा मुद्रांक अधिकारी, सोलापूर तसेच संबंधित वरिष्ठ महसूल व नगररचना अधिकाऱ्यांनी स्वतंत्रपणे चौकशी करावी. ग्रीन झोनमधील संबंधित जमिनींचे दस्त, नोंदणीपूर्वी सादर केलेली कागदपत्रे, दस्त नोंदणीची प्रक्रिया आणि खासगी एजंटांची भूमिका यांची तपासणी करावी, अशी मागणी नागरिकांमधून पुढे येत आहे.
सर्वसामान्य नागरिकांना कायदेशीर मार्गाने जमिनीचे व्यवहार करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असेल, तर काही व्यवहारांबाबत वेगळे निकष लावले जात आहेत
आता प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार?
ग्रीन झोनमधील जमिनींच्या दस्त नोंदणीबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी संबंधित दुय्यम निबंधक कार्यालयाने वस्तुस्थिती स्पष्ट करावी. कोणते दस्त नोंदविण्यात आले, कोणत्या नियमांच्या आधारे नोंदणी झाली आणि त्यामध्ये नियमांचे उल्लंघन झाले आहे का, याची पारदर्शक माहिती नागरिकांना मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
या प्रकरणात संबंधित दुय्यम निबंधक मॅडम तसेच कार्यालयातील अधिकाऱ्यांची अधिकृत बाजू समोर येणेही तितकेच महत्त्वाचे आहे. चौकशीअंती दोष आढळल्यास नियमानुसार कारवाई होणार का, याकडे आता सांगोला शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
भाग नं.९ उद्या वाचा



