ताज्या घडामोडी

महुदच्या वाहतूक कोंडीत चक्क पालकमंत्रीही अडकले! दोन महामार्गांच्या मुख्य चौकात वाहनांच्या दोन किलोमीटरपर्यंत रांगा; अर्धा ते पाऊण तास वाहतूक ठप्प

सांगोला विशेष प्रतिनिधी

विकास गंगणे 

मो ९८८१५८३९३५

 

महुद (ता. सांगोला) येथील मुख्य चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, आता या समस्येची झळ थेट जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनाही बसली आहे. सोमवारी (ता. ९ नोव्हेंबर) दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महुदच्या मुख्य चौकात झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीत जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे वाहनही अडकले. तब्बल अर्धा ते पाऊण तास त्यांना या वाहतूक कोंडीत थांबावे लागल्याची घटना घडली. त्यामुळे महुदमधील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

 

महुद हे एक राष्ट्रीय महामार्ग आणि एक राज्य महामार्ग अशा दोन महत्त्वाच्या मार्गांना जोडणारे मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळे या चौकातून दररोज मोठ्या प्रमाणावर दुचाकी, चारचाकी, एसटी बसेस, अवजड वाहने तसेच मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची ये-जा सुरू असते. मात्र, वाढती वाहनसंख्या आणि अपुरी वाहतूक नियोजन व्यवस्था यामुळे मुख्य चौकात वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.

 

विशेषतः दिवाळी, दसरा, यात्रा, सण-उत्सव तसेच पंढरपूरच्या आषाढी वारीच्या काळात या मार्गावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. परिणामी, महुदच्या मुख्य चौकात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. सोमवारी झालेल्या वाहतूक कोंडीमध्ये तर वाहनांच्या रांगा सुमारे दोन किलोमीटरपर्यंत पोहोचल्याचे चित्र पाहायला मिळाले.

 

या वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्य वाहनचालक, प्रवासी, व्यापारी आणि स्थानिक नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. अत्यावश्यक कामासाठी निघालेल्या नागरिकांचा वेळ वाया जात असून, रुग्णवाहिका किंवा इतर आपत्कालीन वाहनांना अशा परिस्थितीत मार्ग काढताना अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

 

पालकमंत्र्यांच्या वाहनालाच अडथळा; प्रशासनाचे लक्ष वेधले जाणार का?

 

महुदच्या मुख्य चौकातील वाहतूक कोंडीची समस्या अनेक दिवसांपासून नागरिकांच्या चर्चेचा विषय आहे. मात्र, सोमवारी चक्क जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनाच या कोंडीचा सामना करावा लागल्याने या प्रश्नाचे गांभीर्य अधोरेखित झाले आहे. सर्वसामान्य नागरिकांना दररोज सहन करावा लागणारा हा त्रास आता लोकप्रतिनिधींच्याही निदर्शनास आला आहे.

 

महुदच्या मुख्य चौकात कायमस्वरूपी वाहतूक नियोजन करणे, गर्दीच्या वेळेत वाहतूक पोलिसांची नियुक्ती करणे, अवजड वाहनांच्या वाहतुकीचे योग्य नियोजन करणे, चौकातील अतिक्रमण व पार्किंगच्या समस्येची पाहणी करणे, तसेच आवश्यकतेनुसार वाहतूक नियंत्रणासाठी स्वतंत्र उपाययोजना करणे गरजेचे असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

 

आता तरी कायमस्वरूपी उपाययोजना होणार का?

 

महुदचा मुख्य चौक हा दोन महत्त्वाच्या महामार्गांवरील वाहतुकीचा महत्त्वाचा दुवा असल्याने येथे केवळ तात्पुरती वाहतूक व्यवस्था करून प्रश्न सुटणार नाही. यासाठी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाने संयुक्त पाहणी करून ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.

 

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनाही वाहतूक कोंडीचा अनुभव आल्याने आता संबंधित प्रशासन या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देणार का? महुदकरांना दररोजच्या वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार का? की दोन महामार्गांच्या मध्यवर्ती चौकातील हा वाहतूक कोंडीचा प्रश्न असाच कायम राहणार, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??