सांगोला तालुक्यात शासकीय अनुदान अडवणुकीचा आरोप; आंदोलनाचा इशारा

सांगोला : विकास गंगणे
मो.9881583935
सांगोला शहर व तालुक्यातील काही बँकांकडून शासनाच्या विविध योजनांमधून मिळणारे अनुदान लाभार्थ्यांना वेळेवर दिले जात नसल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब ठोकळे यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी लेखी निवेदन देत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, शासनाकडून लाडकी बहीण, श्रावणबाळ यांसारख्या विविध योजनांअंतर्गत महिला व वृद्ध नागरिकांना आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम थेट संबंधितांच्या बँक खात्यात जमा केली जाते. मात्र काही बँक अधिकारी व कर्मचारी लाभार्थ्यांवर असलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी या अनुदानातूनच पैसे जमा करण्यास भाग पाडत असून, प्रत्यक्ष लाभार्थ्यांना रक्कम देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकारामुळे गरीब व गरजू महिलांना वेळेवर आर्थिक मदत मिळत नसून त्यांच्या कुटुंबांचे आर्थिक गणित विस्कळीत होत असल्याचे ठोकळे यांनी सांगितले.
या प्रकरणाची शासनाने तातडीने दखल घेऊन संबंधित बँकांवर कारवाई करावी, तसेच अशा प्रकारांना आळा घालावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा संबंधित बँकांविरोधात टाळेबंदी आंदोलन तसेच रास्ता रोको करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.



