बोरगाव टोलनाक्यावर वाहनधारकांची तारांबळ सुरूच..
टोलवसुली जोमात, सुविधा मात्र कोमात. भाऊसाहेब गेजगे,गाडी चालक

सांगोला विशेष प्रतिनिधी
विकास गंगणे
मो.9881583935
रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय
महामार्गावरील बोरगाव टोल नाक्यावर फक्त दोन ते तीनच लेन सुरू ठेवण्यात येत असल्याने वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. टोल नाक्यावर एकूण १६ लेन (येण्यासाठी ८ व जाण्यासाठी ८) उपलब्ध असतानाही बहुतांश वेळा केवळ दोन किंवा तीन लेनवरच टोल वसुली होत असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. परिणामी वाहनधारकांचा वेळ वाया जात असून इंधनाचाही अतिरिक्त खर्च होत आहे. वाहनचालकांचा वेळ वाचावा आणि प्रवास अधिक जलद व्हावा या उद्देशाने केंद्र शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून राष्ट्रीय महामार्गाची उभारणी केली.
मूलभूत सुविधांचासुद्धा अभाव असल्याचा आरोप
या रस्त्यांच्या उभारणीसाठी वाहनधारकांकडून टोलच्या माध्यमातून शुल्क आकारले जाते. मात्र, टोल भरूनही अपेक्षित सुविधा मिळत नसल्याने वाहनधारकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा वाढल्यानंतरही
अतिरिक्त लेन सुरू केल्या जात नसल्याची तक्रार वाहनधारकांनी केली आहे. काही वेळा टोल कर्मचाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याचेही वाहनधारकांचे म्हणणे आहे.
◼️सुरक्षेबाबतही प्रश्नचिन्ह◼️
अपघात घडल्यास रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध होत नसल्याने जखमींना मदत मिळण्यास विलंब होत असल्याचेही वाहनचालकांनी सांगितले. यापूर्वीही या टोल नाक्यावर वाद आणि मारहाणीच्या घटना घडल्या असून त्याबाबत पोलीस ठाण्यात नोंदी आहेत. त्यामुळे टोल नाक्यावरील व्यवस्थापन आणि सुरक्षेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
——————————————
चौकट

टोल भरण्यासाठी एक मिनिटही उशीर चालत नाही; मग वाहनांना तासन्तास रांगेत का उभे राहावे लागते? १६ लेन असूनही फक्त दोन-तीनच लेन सुरू ठेवणे ही प्रवाशांची थेट गैरसोय आहे. सांगलीला जाताना मला अर्धा तास या रांगेत थांबावे लागले. व्यवस्थापनाने सुधारणा करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल.
भाऊसाहेब (पिंटू)गेजगे
वाहन चालक



