पुराचे अतिरिक्त वाहून जाणारे पाणी माण आणि कोरडा नदीत तसेच ओढे, नाले आणि तलावात सोडा अन्यथा तीव्र आंदोलन करू ;
सांगोल्याच्या पाणी प्रश्नावरून मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील आक्रमक

- सांगोला ; विशेष प्रतिनिधी
विकास गंगणे
मो.9881583935
महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांच्या परिसरात जोरदार अतिवृष्टी झाल्याने सर्वच नद्यांना सध्या महापूर आला आहे मात्र पिढ्यानपिढ्या दुष्काळी तालुका अशी ओळख असणाऱ्या सांगोला तालुका यंदाही दुष्काळाच्या विळख्यात अडकला आहे. दुष्काळी सांगोला तालुक्यातील शेतकरी, पशुपालक तसेच शेतातील उभ्या फळबागा आणि शेती पिकांना जीवनदान देण्यासाठी टेंभू आणि म्हैसाळ योजनेतून सांगोला तालुक्यातील माण व कोरडा नदीत तसेच तालुक्यातील ओढे, नाले आणि तलावात तात्काळ पाणी सोडावे, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी दिला.
सांगोला तालुक्यातील पाणी प्रश्नासाठी सोमवार दि २७ जुलै रोजी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील हे आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांसह सांगोला तहसीलदारांना निवेदन देणार आहेत यानंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार आहे.
राज्यातील कृष्णा, कोयना, पंचगंगा, नीरा आणि भीमा नदीच्या खोऱ्यात तसेच घाटमाथ्यावर प्रचंड पाऊस झाल्याने या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. पुराचे अतिरिक्त पाणी टेंभू उपसा सिंचन योजना, म्हैसाळ उपसा सिंचन योजना तसेच निरा उजवा कालव्यातून दुष्काळ सांगोला तालुक्याला सोडावे म्हणून नुकतीच माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली होती. याविषयी त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता, मात्र याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नाही त्यामुळे दिवसेंदिवस सांगोला तालुक्यातील शेतीच्या पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होऊ लागला आहे.
चालू वर्षी पावसाने पाठ फिरवल्याने सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांचा हक्काचा खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे भूजल पातळीही कमालीची खालावली आहे. त्यामुळे विहिरी, कुपनलिका, तलाव तसेच सर्वच जलस्रोतांनी तळ गाठला आहे. परिणामी, सांगोला तालुक्यातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होऊ लागला आहे. एकीकडे प्रचंड दुष्काळ तर दुसरीकडे प्रचंड अतिवृष्टी या परिस्थितीचा समतोल साधण्यासाठी पुराचे वाहून जाणारे पाणी टेंभू उपसा सिंचन योजनेतून मानगंगा नदीत सोडावे आणि या नदीवरील सर्व कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरून द्यावेत व या पाण्यातून सांगोला तालुक्यातील तलाव भरून द्यावेत त्याचबरोबर म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून कोरडा नदीत पाणी सोडून या नदीवर असणारे सर्व बंधारे आणि तलाव भरून द्यावेत आणि नीरा उजवा कालव्यातूनही दुष्काळी परिसरातील नद्या, नाले, ओढे तलाव तसेच सिंचन योजनांना पाणी सोडल्यास सांगोला तालुक्याचा दुष्काळ कमी होण्यास मदत होणार आहे अशी आग्रही मागणी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी राज्य सरकारकडे आहे.
पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले तरीही, पावसाने हजेरी न लावल्याने सांगोला तालुक्यातील शेतकरी हवालदील झाला आहे अशावेळी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आता माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील चांगलेच आक्रमक झाले आहेत याप्रकरणी तत्काळ तोडगा न काढल्यास आगामी काळात तीव्र स्वरूपाची आंदोलन करून सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न प्रभावीपणे राज्य सरकार पुढे मांडणार असल्याचेही शेवटी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी सांगितले.
चौकट ;
१) आधी लेखी निवेदन मग ठरणार आंदोलनाची दिशा
सांगोला तालुक्याच्या पाणी प्रश्नासाठी सोमवार दि २७ रोजी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील आपल्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह प्रशासनाला लेखी निवेदन देणार आहेत. यानंतर शासन आणि प्रशासन कोणती भूमिका घेणार यावर तालुक्यातील पाणी प्रश्नासाठी होणाऱ्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार असल्याचे ज्येष्ठ नेते तानाजीकाका पाटील यांनी सांगितले.



