कृष्णेत पूर, जत तहानलेला!; म्हैसाळचे पाणी तातडीने सोडा, अन्यथा तीव्र आंदोलन – सुनील बागडे

जत तालुका प्रतिनिधी: बाबासाहेब साबळे
सांगली जिल्ह्यात कृष्णा नदी दुथडी भरून वाहत असताना दुष्काळग्रस्त जत तालुका मात्र तीव्र पाणीटंचाईने होरपळत आहे. या पार्श्वभूमीवर म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे आवर्तन तातडीने सुरू करून जत तालुक्याला पाणी सोडावे, अन्यथा प्रहार जनशक्ती संघटना तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा संघटनेचे जत तालुका अध्यक्ष सुनील बागडे यांनी दिला आहे.
वरच्या धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असून कृष्णा नदीत मुबलक पाणी उपलब्ध आहे. मात्र जत तालुक्यात विहिरी, कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. पिके करपत असून जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशा परिस्थितीत उपलब्ध पाण्याचा समन्यायी वापर करून दुष्काळी जतला दिलासा देणे ही शासनाची जबाबदारी असल्याचे बागडे यांनी म्हटले.
“एकीकडे कृष्णा नदी भरून वाहत आहे आणि दुसरीकडे जतचा शेतकरी पाण्याच्या एका थेंबासाठी हवालदिल झाला आहे. जलसंपदा विभागाने कोणतीही दिरंगाई न करता म्हैसाळ योजनेचे सर्व टप्पे पूर्ण क्षमतेने सुरू करून पाणी जतकडे वळवावे. अन्यथा प्रहार जनशक्ती संघटना बळीराजाला सोबत घेऊन रस्त्यावर उतरेल,” असा इशाराही त्यांनी दिला.
प्रहार जनशक्ती संघटनेने म्हैसाळ योजनेचे सर्व टप्पे त्वरित सुरू करणे, जत तालुक्यातील पाझर तलाव व साठवण तलाव भरून काढणे आणि शेती व जनावरांसाठी प्राधान्याने पाण्याचे नियोजन करणे, या प्रमुख मागण्या शासनाकडे केल्या आहेत. प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास जत तालुक्यात व्यापक व तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सुनील बागडे यांनी दिला आहे.


