फियाट गाडी, माझी म्हणू का?’

गाडी नव्हे, तर सर्वसामान्यांच्या स्वप्नांचा प्रवास
सो शल मीडियावर सध्या गाजत असलेले “माझी म्हणू का, ही फियाट गाडी माझी म्हणू का?” हे गीत केवळ मनोरंजन करणारे नाही; तर ते सर्वसामान्य माणसाच्या स्वप्नांना शब्द देणारे गीत आहे. महाकवी वामनदादा कर्डक यांच्या लेखणीतून जन्मलेले हे गीत आजही तितकेच ताजे वाटते.
गाण्याची सुरुवातच एका साध्या प्रश्नाने होते -“ही फियाट गाडी माझी म्हणू का?” या प्रश्नात मालकीचा अहंकार नाही, तर क्षणभर तरी सुख आपल्या वाटयाला आले आहे, अशी भावनाच व्यक होते.
“दोन घडीचा या गाडीचा ड्रायव्हर बनू का?”
या ओळीतून आयुष्याचे मोठे तत्वज्ञान व्यक होते. आयुष्यभर प्रत्येक गोष्ट आपली असतेच असे नाही. पण काही क्षण मिळाले, तर ते मनापासून जगावेत, असा आशय यात दडलेला आहे.
“म्या पॉम पॉम करावं, तुम्ही बाजूला सरावं…”
या ओळी विनोदी वाटतात; पण त्या एका सामान्य माणसाच्या आत्मविश्वासाचे प्रतीक आहेत. आयुष्यभर इतरांच्या मागे राहिलेला माणूस एकदा तशी स्वतः पुढे जाऊन जगण्याचा आनंद अनुभवू इच्छितो.
“इथं मी राजा, हिला मी माझी राणी म्हणू का?”
या ओळीत संपत्तीचा गर्व नाही, तर प्रेम, आनंद आणि स्वप्नांची उंच भरारी आहे.
“ही बसली मनात, काळजाच्या कणात…”
या ओळी तरुण मनातील भावविश्व व्यक्त करतात. चांदण्याच्या रात्री आवडत्या व्यक्तीसोबत फिरण्याचे स्वप्न कोणाचे नसते? तेच या गीतातून सहज व्यक्त झाले आहे.
गाण्याच्या शेवटच्या भागात वामनदादा कर्डक यांच्या रचनेला नव्या पिढीतील शाहिरांनी दिलेला आवाज दिसतो. त्यामुळे हे गीत एका पिढीकडून दुसन्या पिढीकडे पोहोचत राहिले आहे.
आज ‘फियाट’ कार रस्त्यावर क्वचितच दिसते; पण या गाण्याचा अर्थ अजूनही जिवंत आहे. आजची ‘फियाट’ म्हणजे कोणासाठी स्वतःचे घर, कोणासाठी नोकरी, कोणासाठी शिक्षण, तर कोणासाठी आधुनिक कार. काळ बदलला, साधने बदलली; पण सामान्य माणसाची स्वप्ने बदललेली नाहीत.
म्हणूनच “फियाट गाडी माझी म्हणू का?’ हा प्रश्न एका गाडीचा नसून, “माझ्या स्वप्नांवर माझाही हक्क आहे का?” असा आहे. हेच या गीताचे खरे सामर्थ्य आहे.
विशेष लेख:-पत्रकार विकास गंगणे


