ताज्या घडामोडी

डिकसळकरांनो, पाण्याचा प्रत्येक थेंब जपा; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते विजय बाबर यांचे आवाहन

सांगोला विशेष प्रतिनिधी 

विकास गंगणे 

 मो.9881583935

 

यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने ग्रामीण भागात पाणीटंचाईचे संकट अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर डिकसळ गावातील प्रत्येक नागरिकाने पाण्याचा काटकसरीने वापर करून पाण्याचा प्रत्येक थेंब जपावा, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते विजय बाबर यांनी केले आहे.

 

गावातील नागरिकांच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यावर मर्यादा येत असल्याने भविष्यातील संभाव्य टंचाईचा विचार करून आतापासूनच पाणी बचतीला प्राधान्य देणे गरजेचे आहे. घरगुती वापरातील पाणी अनावश्यकपणे वाया जाऊ नये, नळ सुरू ठेवून पाणी वाया घालवू नये तसेच उपलब्ध पाण्याचा आवश्यक तेवढाच वापर करावा, अशी अपेक्षा ग्रामपंचायतीकडून व्यक्त करण्यात आली आहे.

 

दुष्काळाच्या परिस्थितीत केवळ प्रशासनाच्या उपाययोजनांवर अवलंबून न राहता प्रत्येक कुटुंबाने पाणी बचतीची जबाबदारी स्वीकारणे आवश्यक आहे. घरातील नळ, पाण्याच्या टाक्या व पाइपलाइनमधून होणारी गळती तातडीने दुरुस्त करणे, पाण्याचा पुनर्वापर शक्य असेल तेथे करणे आणि अनावश्यक पाणी वापर टाळणे यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होऊ शकते.

 

गावातील नागरिकांनी पाणी उपलब्धतेचे गांभीर्य लक्षात घेऊन एकमेकांना सहकार्य करावे. विशेषतः उन्हाळ्यात पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता असल्याने आजपासूनच पाणी बचतीच्या सवयी अंगीकारणे ही काळाची गरज असल्याचे ग्रामसेवक सुनील साळुंखे यांनी सांगितले.

 

डिकसळ ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पाणीपुरवठा व्यवस्थेवर लक्ष ठेवतानाच नागरिकांनीही उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. “पाणी आहे म्हणून वापरायचे नाही, तर गरजेनुसार जपून वापरायचे” हा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.

 

दरम्यान, गावातील पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेता उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन, पाण्याची गळती रोखणे आणि भविष्यातील पाणीपुरवठ्याचे नियोजन याकडे ग्रामपंचायतीने प्राधान्याने लक्ष देण्याची गरज आहे. नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करून पाणी बचतीची चळवळ गावपातळीवर प्रभावीपणे राबवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??