ताज्या घडामोडी

मोफत प्रवास असूनही तिकीटाचा घोळ; डिकसळच्या प्रवाशांचा संताप!

NCMC कार्ड काढताना अडचणींची तक्रार; सांगोला आगारातील संबंधितांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याचा प्रवाशांचा आरोप

सांगोला विशेष प्रतिनिधी 

विकास गंगणे 

मो.9881583935

 

  शासनाच्या नियमानुसार पात्र प्रवाशांना मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध असतानाही तिकीट व NCMC कार्डच्या प्रक्रियेत निर्माण होणाऱ्या तांत्रिक व प्रशासकीय अडचणींमुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार डिकसळ येथील काही प्रवाशांनी केली आहे. मोफत प्रवासासाठी आवश्यक असलेल्या कार्ड प्रक्रियेत अडचणी आल्याने प्रवाशांना सांगोला आगारात जावे लागत असून, तेथेही अपेक्षित मार्गदर्शन मिळत नसल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

 

प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, NCMC कार्ड काढताना काही एजंट किंवा संबंधित प्रक्रियेत झालेल्या चुकीमुळे अडचणी निर्माण झाल्या. त्यानंतर समस्या सोडविण्यासाठी सांगोला आगारात गेलेल्या प्रवाशांना काही संबंधित कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक माहिती मिळण्याऐवजी उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याची तक्रार आहे. त्यामुळे मोफत प्रवासाची सुविधा असताना कार्ड आणि तिकीटाच्या प्रक्रियेत प्रवाशांची अशी गैरसोय का? असा सवाल उपस्थित होत आहे.

 

विशेषतः ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि इतर पात्र प्रवाशांना कार्ड प्रक्रियेतील तांत्रिक बाबी समजून घेणे कठीण जाते. त्यामुळे आगार प्रशासनाने प्रवाशांना स्पष्ट माहिती देण्यासाठी स्वतंत्र मार्गदर्शन व्यवस्था करणे गरजेचे आहे. कार्ड तयार करताना झालेल्या चुका असल्यास त्या तातडीने दुरुस्त करून प्रवाशांना पुन्हा पुन्हा आगारात येण्याची वेळ येऊ नये, अशी मागणी होत आहे.

 

या संपूर्ण प्रकाराबाबत सांगोला आगार प्रमुख अंकुश सरगर कोणती भूमिका घेणार? तसेच NCMC कार्ड प्रक्रियेत नेमकी कुठे अडचण निर्माण झाली, प्रवाशांना चुकीची माहिती किंवा तिकीट देण्यात आले का, याची चौकशी करून जबाबदारी निश्चित केली जाणार का, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

प्रवाशांना सुविधा देणे हे एस.टी. प्रशासनाचे कर्तव्य असताना तिकीट, कार्ड आणि कार्यालयीन प्रक्रियेमुळे त्यांची गैरसोय होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यामुळे सांगोला आगारातील संबंधित यंत्रणेने या तक्रारींची दखल घेऊन प्रवाशांना दिलासा देण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी डिकसळ परिसरातून होत आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??