डिकसळच्या सहाय्यक सहाय्यक कृषी अधिकारी दत्ता खरात यांच्या कामाचे शेतकऱ्यांकडून कौतुक
वेळेचे बंधन न ठेवता शेतकऱ्यांना मार्गदर्शन; सेवाभावी कार्याची गावात चर्चा

सांगोला | विशेष प्रतिनिधी विकास गंगणे
मो.9881583935
सांगोला तालुक्यातील डिकसळ गावचे सहाय्यक कृषी अधिकारी दत्ता खरात यांनी गावाचा पदभार स्वीकारल्यापासून शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि सहकार्य करण्यावर भर दिल्याचे चित्र दिसून येत आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना योग्य माहिती देणे, त्यांच्या प्रश्नांना प्रतिसाद देणे आणि शेतीविषयक समस्यांबाबत मार्गदर्शन करणे, या कामांमुळे त्यांच्याविषयी शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
शेती हा ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार आहे. बदलते हवामान, पिकांवरील रोग-किडींचा प्रादुर्भाव, विविध कृषी योजना, अनुदानासाठी आवश्यक कागदपत्रे आणि ऑनलाइन अर्ज प्रक्रिया अशा अनेक बाबींमध्ये शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शनाची गरज असते. अशा परिस्थितीत कृषी विभागातील क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संपर्कात राहून त्यांच्या प्रश्नांना योग्य उत्तरे देणे महत्त्वाचे ठरते.
डिकसळचे सहाय्यक कृषी अधिकारी
दत्ता खरात हे शेतकऱ्यांच्या अडचणी ऐकून घेत असल्याचे तसेच वेळ संपल्यानंतरही काही शेतकऱ्यांचे फोन आल्यास त्यांना आवश्यक माहिती देत असल्याचे ग्रामस्थांकडून सांगितले जात आहे. शेतकऱ्यांना केवळ वेळेचे कारण पुढे न करता त्यांच्या प्रश्नांना प्रतिसाद देण्याची त्यांची कार्यपद्धती समाधानकारक वाटत असल्याची भावना काही शेतकरी व्यक्त करीत आहेत.
“याअगोदरही आमच्या गावाला कृषी सहाय्यक होते; मात्र दत्ता खरात यांच्यासारखे सहकार्य करणारे सहाय्यक कृषी अधिकारी आम्हाला पुन्हा मिळतील की नाही, असे वाटते,” अशा भावना काही शेतकरी व्यक्त करीत असल्याचे सांगितले जाते. शेतकऱ्यांशी संवाद ठेवणे, त्यांना योग्य माहिती देणे आणि त्यांच्या अडचणी समजून घेणे, या गोष्टींमुळे कृषी सहाय्यक आणि शेतकरी यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक मजबूत होत असल्याचे दिसून येते.
शासकीय यंत्रणा आणि शेतकरी यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून सहाय्यक कृषी अधिकारी भूमिका असते. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर मार्गदर्शन मिळणे, योजनांची अचूक माहिती उपलब्ध होणे आणि त्यांच्या प्रश्नांवर योग्य कार्यवाही होणे आवश्यक आहे. दत्ता खरात यांच्या कामाविषयी व्यक्त होत असलेले समाधान हे शेतकऱ्यांशी सुसंवाद ठेवणाऱ्या कार्यपद्धतीचे महत्त्व अधोरेखित करणारे आहे.



