ताज्या घडामोडी

जवळा–भोपसेवाडी–डिकसळ–नराळे रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तुकाराम भुसनर सरांचा पुढाकार

रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर; आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्याकडे भरीव निधीसाठी पाठपुरावा करणार

सांगोला विशेष प्रतिनिधी| विकास गंगणे

मो.9881583935

 

 

जवळा ते भोपसेवाडी, डिकसळ आणि नराळे या मार्गावरील रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालक आणि प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. यापूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी डांबर टाकण्यात आले होते; मात्र काही ठिकाणी पुन्हा खड्डे पडल्याने रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. यासंदर्भात बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याच्या कामासाठी प्रत्येक वेळी अंदाजपत्रक व निधीची मागणी पाठवली जात असल्याचे सांगितले. मात्र, कमी बजेट उपलब्ध होणे आणि डांबर मिळण्यात अडचणी येणे, ही कामात विलंब होण्यामागील कारणे असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्याची माहिती समोर आली आहे.

 

दरम्यान, डिकसळचे माजी सरपंच तुकाराम भुसनर सर यांनी रस्त्यावरील खड्डे बुजवण्याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा करून पाठपुरावा केला. त्यावेळीही अधिकाऱ्यांकडून कमी निधी आणि डांबराच्या उपलब्धतेतील अडचणींचे कारण सांगण्यात आल्याचे समजते. मात्र, केवळ तात्पुरती खड्डे बुजवण्याची कामे करण्याऐवजी या रस्त्याच्या कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी पुरेसा निधी उपलब्ध होणे आवश्यक असल्याची भूमिका भुसनर यांनी घेतली आहे.

 

या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी माजी सरपंच तुकाराम भुसनर सर हे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्याशी चर्चा करून रस्त्याच्या कामासाठी भरीव निधी मिळवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहेत. यासाठी आमदार डॉ. देशमुख यांचे पत्रही घेऊन संबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यामुळे या मार्गाच्या दुरुस्तीचा प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

 

तात्पुरत्या डागडुजीऐवजी कायमस्वरूपी उपाययोजना हवी!

 

रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम वारंवार करावे लागत असेल, तर रस्त्याच्या दुरुस्तीच्या गुणवत्तेचा आणि उपलब्ध निधीचा आढावा घेणे आवश्यक आहे. संबंधित विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून रस्त्याच्या दुरवस्थेचे गांभीर्य लक्षात घ्यावे, तसेच आवश्यक निधीसाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा वाहनचालक आणि परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

 

आता माजी सरपंच तुकाराम भुसनर सर यांच्या पुढाकाराला कितपत यश मिळते आणि आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या माध्यमातून या रस्त्यासाठी भरीव निधी उपलब्ध होतो का, याकडे जवळा, भोपसेवाडी, डिकसळ आणि नराळे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??