ताज्या घडामोडी

डिकसळमध्ये वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर;

वनव्यवस्थापन समितीची वनक्षेत्रात पाहणी, सौरऊर्जा प्लेट खराब असल्याने पाणीपुरवठा कमी; वनविभागाने तातडीने लक्ष देण्याची मागणी

सांगोला विशेष प्रतिनिधी : विकास गंगणे

 

डिकसळ (ता. सांगोला) येथील वनक्षेत्रात वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था योग्य प्रकारे सुरू आहे की नाही, याची पाहणी वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय करांडे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अशोक करताडे व रणजित गंगणे यांनी वनविभागात जाऊन केली. यावेळी काही पाणवठ्यांमध्ये पाणी कमी प्रमाणात येत असल्याचे तसेच सौरऊर्जा प्लेट खराब असल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आल्याचे सांगण्यात आले.

 

सांगोला तालुक्यात दुष्काळी परिस्थितीमुळे पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशा परिस्थितीत वनक्षेत्रातील वन्यप्राण्यांनाही पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये, यासाठी वनविभागाने उभारलेल्या पाणवठ्यांची नियमित देखभाल करणे आवश्यक आहे. मात्र, डिकसळ परिसरातील काही पाणवठ्यांमध्ये पाण्याची उपलब्धता कमी असल्याची बाब पाहणीदरम्यान समोर आली.

 

काही ठिकाणी पाणी साठविण्यासाठी तयार केलेल्या खड्ड्यांमध्ये शेतकऱ्यांनी शेतीसाठी वापरले जाणारे पाइप टाकल्याचेही आढळून आल्याचे सांगण्यात आले. या पाइपचा वापर नेमका कशासाठी केला जात आहे, तसेच त्याचा वन्यप्राण्यांच्या पाण्याच्या उपलब्धतेवर काही परिणाम होत आहे का, याची संबंधित विभागाने तपासणी करणे गरजेचे आहे.

 

वनक्षेत्रातील काही पाणवठ्यांकडे नियमित लक्ष दिले जात नसल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. सौरऊर्जा प्लेटची दुरुस्ती करणे, पाणीपुरवठा सुरळीत करणे आणि पाणवठ्यांची नियमित स्वच्छता व देखभाल करणे आवश्यक आहे. अन्यथा, पाण्याअभावी वन्यप्राण्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

 

वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय करांडे यांनी संबंधित वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेबाबत विचारपूस केली. वनक्षेत्रातील पाणवठे सुस्थितीत ठेवून वन्यप्राण्यांना पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

 

वन्यप्राण्यांसाठी पाणवठे उभारणे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच त्यांची नियमित देखभाल करणेही गरजेचे आहे. त्यामुळे संबंधित वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन खराब सौरऊर्जा प्लेटची दुरुस्ती, पाणीपुरवठ्याची तपासणी आणि पाणवठ्यांची देखभाल याबाबत तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी वन्यजीवप्रेमी व नागरिकांकडून होत आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??