सोनंद चौकात अवैध वाळू वाहतूक करणारा टेम्पो पकडला; ४ लाखांचा मुद्देमाल जप्त!

सांगोला विशेष प्रतिनिधी
विकास गंगणे
मो9881583935
सांगोला तालुक्यातील अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. मौजे सोनंद येथील चौकात विनापरवाना वाळू वाहतूक करणारा निळ्या रंगाचा अशोक लेलँड टेम्पो पोलिसांनी पकडला. या कारवाईत सुमारे एक ब्रास वाळूसह टेम्पो असा एकूण ४ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी टेम्पो चालक संतोष सौदागर भालके (वय २१, रा. वासूद-अकोला, ता. सांगोला) याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या फिर्यादी जबाबानुसार, दिनांक २९ ऑक्टोबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय राठोड यांच्या नेतृत्वाखाली पथक अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी सांगोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत कार्यरत होते. यावेळी मौजे सोनंद गावच्या हद्दीतून एका अशोक लेलँड टेम्पोमधून चोरून वाळू वाहतूक करून विक्रीसाठी नेली जाणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन पंचांना सोबत घेऊन सांगोला-जत महामार्गावरील सोनंद चौक परिसरात सापळा रचला. रात्री सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास समोरून निळ्या रंगाचा अशोक लेलँड टेम्पो येताना दिसला. संशयावरून पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली असता टेम्पोच्या मागील हौद्यात अंदाजे एक ब्रास वाळू आढळून आली.
वाळू वाहतुकीसाठी महसूल विभागाचा परवाना किंवा रॉयल्टी पावती आहे का, अशी विचारणा केली असता चालकाकडे कोणताही परवाना अथवा रॉयल्टी पावती नसल्याचे समोर आले. त्यानंतर पंचांसमक्ष पोलिसांनी वाहन आणि वाळू जप्त केली.
या कारवाईत अंदाजे ४ लाख रुपये किमतीचा विनानंबरचा निळ्या रंगाचा अशोक लेलँड टेम्पो आणि ७ हजार रुपये किमतीची एक ब्रास वाळू, असा एकूण ४ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी टेम्पो चालक संतोष सौदागर भालके याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) तसेच पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ मधील कलम ९ व १५ अन्वये सरकारतर्फे फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
अवैध वाळू उपशावर पोलिसांची नजर
माण नदी व परिसरातील वाळू उपसा आणि विनापरवाना वाहतुकीच्या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. नैसर्गिक जलस्रोतांचे संरक्षण, पर्यावरणाचा समतोल आणि शासनाच्या महसुलाचे नुकसान टाळण्यासाठी अवैध वाळू वाहतुकीविरोधात कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. सोनंद येथील या कारवाईमुळे अवैध वाळू वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.



