ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दुष्काळी पंचनामे करणारे कृषी सहाय्यक दत्ता खरात यांचे शेतकऱ्यांकडून कौतुक भाग नं.१_____

सांगोला विशेष प्रतिनिधी

विकास गंगणे

मो.9881583935

 

डिकसळ (ता. सांगोला) येथील सहाय्यक कृषी अधिकारी दत्ता खरात यांनी ऐन दुष्काळाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करत शासनाच्या नियम व मार्गदर्शक सूचनांनुसार पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम केले आहे. कडक ऊन, प्रतिकूल परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या अडचणींची जाणीव ठेवत त्यांनी आपली जबाबदारी पार पाडल्याने परिसरातील शेतकऱ्यांकडून त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे.

 

शासनाने त्यांच्याकडे सोपविलेल्या गावांमध्ये त्यांनी केवळ कार्यालयात बसून काम न करता प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांची परिस्थिती जाणून घेतली. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली, आवश्यक पंचनामे पूर्ण करून संबंधित अहवाल शासनाकडे पाठविण्याची कार्यवाही केली. दुष्काळामुळे आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीचा लाभ मिळावा, यासाठी त्यांनी नियमानुसार कार्यवाही केल्याचे शेतकरी सांगत आहेत.

 

विशेष म्हणजे, गेल्या वर्षी ओल्या दुष्काळाच्या परिस्थितीतही दत्ता खरात यांनी शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन प्रत्यक्ष पंचनामे केले होते. त्यानंतर संबंधित प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले आणि पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानभरपाईची रक्कम जमा झाली होती. त्यामुळे त्यांच्या कामाबाबत शेतकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे.

 

आज पुन्हा एकदा दुष्काळाचे संकट उभे राहिले असताना खरात यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत प्रत्यक्ष बांधावर जाऊन काम केल्याने शेतकरी त्यांचे आभार व्यक्त करत आहेत. शासकीय अधिकारी म्हणून केवळ कर्तव्य पार पाडणे नव्हे, तर अडचणीच्या काळात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांना योग्य मार्गदर्शन करणे किती महत्त्वाचे आहे, याचे उदाहरण त्यांच्या कामातून दिसून येत असल्याची भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत.

 

दरम्यान, दत्ता खरात यांची बदली झाल्यास त्यांच्या जागी शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेणारा आणि प्रत्यक्ष बांधावर जाऊन काम करणारा अधिकारी मिळणे कठीण जाईल, अशी भावना काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे दत्ता खरात यांनी डिकसळ परिसरात केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांना येथेच कायम ठेवावे, अशी अपेक्षाही शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

 

▪️शेतकऱ्यांना संकटाच्या काळात कार्यालयाचे उंबरठे झिजवायला लावण्याऐवजी स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचणारा अधिकारी मिळणे हीच खरी दिलासादायक बाब असल्याची चर्चा सध्या डिकसळ परिसरात सुरू आहे.

 

भाग नं.२ उद्या सविस्तर वाचा….

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??