ताज्या घडामोडी

हंगिरगे तलाठी कार्यालयात नागरिकांची कामे खोळंबली; तलाठी भेटत नसल्याने शेतकरी व नागरिकांची गैरसोय!

सांगोला विशेष प्रतिनिधी : विकास गंगणे

मो.9881583935

 

सांगोला तालुक्यातील हंगिरगे येथील तलाठी कार्यालयाच्या कामकाजाबाबत नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. तलाठ्यांची भेट घेण्यासाठी नागरिकांना वारंवार कार्यालयात जावे लागत असून, अनेकदा तलाठी उपलब्ध होत नसल्याने शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांची कामे खोळंबत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.

 

शेतीविषयक कागदपत्रे, सातबारा उतारे, फेरफार नोंदी, पीक पाहणी तसेच विविध शासकीय कामांसाठी नागरिकांना तलाठ्यांची आवश्यकता असते. मात्र, संबंधित तलाठ्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कधी फोन लागतो, तर कधी फोनला प्रतिसाद मिळत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे नेमके कोणत्या दिवशी आणि कोणत्या वेळेत तलाठी कार्यालयात उपलब्ध असतात, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

 

दुसरीकडे, मंगळवेढा ते हंगिरगे, येळवी मार्गे जत तालुक्याकडे होणाऱ्या वाळू वाहतुकीचाही मुद्दा चर्चेत आहे. या मार्गावरून वाळूची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे. या वाहतुकीवर महसूल विभागाचे लक्ष आहे का? संबंधित मार्गावर तपासणी केली जाते का? नियमबाह्य वाहतूक आढळल्यास कोणती कारवाई केली जाते, असे प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.

 

हंगिरगे तलाठी सज्जातील नागरिकांना महसुली कामांसाठी वारंवार हेलपाटे मारावे लागत असताना, दुसरीकडे वाळू वाहतुकीच्या प्रश्नाकडेही संबंधित यंत्रणेने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. तलाठ्यांच्या कार्यालयीन उपस्थितीचे वेळापत्रक स्पष्ट करणे, नागरिकांचे दूरध्वनी स्वीकारणे आणि प्रलंबित कामांचा निपटारा करणे आवश्यक आहे.

तहसीलदार या तक्रारींची दखल घेऊन हंगिरगे तलाठ्यांच्या कार्यालयीन उपस्थितीबाबत चौकशी करणार का? तसेच मंगळवेढा–हंगिरगे–येळवी मार्गे जत तालुक्याकडे होणाऱ्या वाळू वाहतुकीची तपासणी करून नियमबाह्य वाहतुकीवर कारवाई करणार का? याकडे हंगिरगे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??