बातमी प्रसिद्ध होताच सांगोला दुय्यम निबंधक कार्यालयातील साक्षीदारांचा दर २०० वरून ५०० रुपयांवर?

सांगोला विशेष प्रतिनिधी : विकास गंगणे
सांगोला येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील खरेदी-विक्री व्यवहारांच्या कामकाजाबाबत यापूर्वी बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर आता आणखी काही बाबी चर्चेत आल्या आहेत. जमिनीच्या खरेदी-विक्री दस्त नोंदणीसाठी साक्षीदार म्हणून उपस्थित राहणाऱ्या व्यक्तींकडून यापूर्वी २०० रुपये घेतले जात असल्याची चर्चा होती. मात्र, आता हा दर ५०० रुपयांपर्यंत पोहोचल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे. त्यामुळे दस्त नोंदणी प्रक्रियेतील साक्षीदारांची भूमिका, त्यांची निवड आणि त्यांच्याकडून घेतल्या जाणाऱ्या पैशांबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, काही खरेदी-विक्री व्यवहारांमध्ये साक्षीदार म्हणून उपस्थित राहणारी व्यक्ती संबंधित जमीन खरेदी करणाऱ्या किंवा विक्री करणाऱ्या गावातीलच असणे आवश्यक आहे का, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे. तसेच एकच व्यक्ती दिवसभरात अनेक वेगवेगळ्या खरेदी-विक्री व्यवहारांसाठी साक्षीदार म्हणून उपस्थित राहत असल्याची चर्चा आहे. प्रत्येक वेळी आधारकार्ड जोडणे, फोटो काढणे आणि त्याबदल्यात ५०० रुपये घेणे, अशा प्रकारचे व्यवहार होत असल्याचे बोलले जात आहे.
मात्र, अशा पद्धतीने साक्षीदार उपलब्ध करून देणे आणि त्याबदल्यात पैसे घेणे शासनाच्या नोंदणीविषयक नियमांनुसार मान्य आहे का? साक्षीदारांची ओळख, त्यांची प्रत्यक्ष उपस्थिती आणि संबंधित व्यवहारातील त्यांची भूमिका यांची कार्यालयाकडून योग्य पडताळणी केली जाते का? एकाच व्यक्तीची वारंवार साक्षीदार म्हणून उपस्थिती असल्यास त्याची नोंद व तपासणी केली जाते का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.



