दुय्यम निबंधक कार्यालयातील खाजगी एजंटांच्या हस्तक्षेपावरून गंभीर आरोप; आर्थिक व्यवहारांच्या संशयाची चौकशी करा!

भाग.नं.७
सांगोला विशेष प्रतिनिधी
विकास गंगणे
मो.९८८१५८३९३५
अधिकारी-कर्मचाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याचा सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप; वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वस्तुस्थिती तपासण्याची मागणी,
सांगोला येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील कामकाजावरून सध्या विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. कार्यालयात खाजगी एजंटांचा वाढता हस्तक्षेप, नागरिकांना कामकाजासाठी एजंटांवर अवलंबून राहावे लागत असल्याच्या तक्रारी आणि काही एजंटांना मिळणारी विशेष वागणूक यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
या प्रकरणात दुय्यम निबंधक मॅडम तसेच कार्यालयातील काही कर्मचारी खाजगी एजंटांच्या आर्थिक व्यवहारांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. काही अधिकारी-कर्मचारी आणि खाजगी एजंट यांच्यात आर्थिक हितसंबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, या आरोपांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी होत आहे.
जमिनीची खरेदी-विक्री, दस्तनोंदणी आणि इतर शासकीय कामांसाठी नागरिक दुय्यम निबंधक कार्यालयात येतात. मात्र, कार्यालयातील प्रक्रिया पारदर्शकपणे आणि नियमानुसार पार पडते का?, खाजगी एजंटांचा प्रत्यक्ष कामकाजात किती हस्तक्षेप आहे, तसेच नागरिकांना थेट सेवा मिळण्यात कोणत्या अडचणी येतात, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
काही एजंटांना कार्यालयीन कामकाजात विशेष प्राधान्य मिळत असल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत. मग संबंधित सांगोलच्या स्थानिक एजंटांना एवढे महत्त्व नेमके कशाच्या आधारावर दिले जाते? कार्यालयात येणाऱ्या सामान्य नागरिकांना थेट सेवा मिळविण्यासाठी अडचणींचा सामना का करावा लागतो? खाजगी व्यक्तींचा कार्यालयीन कामकाजातील हस्तक्षेप रोखण्याची जबाबदारी कोणाची? असे प्रश्न सामाजिक कार्यकर्त्यांकडून उपस्थित केले जात आहेत.
• वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करावी•
या संपूर्ण प्रकरणाची जिल्हा मुद्रांक अधिकारी, सोलापूर तसेच संबंधित वरिष्ठ विभागीय अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घ्यावी. कार्यालयातील सीसीटीव्ही चित्रीकरण, दस्तनोंदणी प्रक्रियेतील नियमांचे पालन, एजंटांचा हस्तक्षेप आणि नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींची स्वतंत्रपणे तपासणी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.
शासकीय कार्यालय हे सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी असताना तेथे खाजगी एजंटांचे वर्चस्व निर्माण होत असल्याच्या तक्रारी निर्माण होणे ही चिंतेची बाब आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी या आरोपांबाबत आपली अधिकृत भूमिका स्पष्ट करणेही आवश्यक आहे.
आरोप खरे की गैरसमज, याचा निर्णय निष्पक्ष चौकशीतूनच व्हायला हवा. मात्र, सांगोला दुय्यम निबंधक कार्यालयातील कामकाज पारदर्शक व्हावे, नागरिकांची गैरसोय थांबावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई व्हावी, हीच सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे.
भाग नं.८ उद्या वाचा



