दुष्काळी मदतीचे ५ हजार काही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, तर काही अद्याप प्रतीक्षेत!
तहसील कार्यालयात शेतकऱ्यांची हेलपाटे; अधिकाऱ्यांच्या उत्तरांबाबत नाराजी, तहसीलदारांनी लक्ष घालण्याची मागणी

सांगोला विशेष प्रतिनिधी : विकास गंगणे
मो.9881583935
शासनाकडून दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जाहीर करण्यात आलेली पाच हजार रुपयांची आर्थिक मदत काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाली आहे. मात्र, अद्याप अनेक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनाने मदत जाहीर केली, काहींना ती मिळाली; मग आमच्या खात्यात अद्याप पैसे का जमा झाले नाहीत, असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत.
या मदतीची माहिती घेण्यासाठी शेतकरी कृषी विभाग, तलाठी कार्यालय आणि त्यानंतर तहसील कार्यालय अशा विविध ठिकाणी हेलपाटे मारत आहेत. मात्र, संबंधित विभागाकडून समाधानकारक माहिती मिळत नसल्याची तक्रार काही शेतकऱ्यांनी केली आहे. तहसील कार्यालयात जाऊन संबंधित विभागातील अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, काही शेतकऱ्यांना स्पष्ट उत्तर देण्याऐवजी तलाठी कार्यालयात चौकशी करा, असे सांगितले जात असल्याचा अनुभव शेतकऱ्यांनी व्यक्त केला.
एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात पाठविले जात असल्याने शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा खर्च होत आहे. विशेषतः शासकीय योजनांची ऑनलाइन प्रक्रिया, अर्जाची स्थिती, पात्रता आणि अनुदान जमा होण्याची तांत्रिक कारणे यांची पुरेशी माहिती नसलेल्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे.
मदत जाहीर झाली, मग खात्यात जमा का नाही?
पाच हजार रुपयांची मदत नेमकी कोणत्या कारणामुळे रखडली आहे? शेतकऱ्यांच्या अर्जात त्रुटी आहेत का? बँक खाते, आधार संलग्नता, ई-केवायसी किंवा इतर तांत्रिक अडचणी आहेत का? पात्र शेतकऱ्यांची यादी आणि अनुदान वितरणाची सद्यस्थिती काय आहे? याबाबत प्रशासनाने स्पष्ट माहिती देणे गरजेचे आहे.
तहसीलदार कोणती भूमिका घेणार?
तहसील कार्यालय हे सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे शासकीय केंद्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात पाठविण्याऐवजी त्यांच्या तक्रारींची नोंद घेऊन संबंधित विभागाकडून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी होत आहे. तहसीलदारांनी या प्रकरणात लक्ष घालून कृषी विभाग, महसूल विभाग आणि संबंधित यंत्रणेची संयुक्त बैठक घेऊन मदत न मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांची यादी तपासावी व प्रलंबित रक्कम मिळण्यासाठी कार्यवाही करावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.
शासनाने जाहीर केलेली मदत पात्र शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचणार का? तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांना स्पष्ट उत्तरे देण्यासाठी संबंधित अधिकारी पुढाकार घेणार का? याकडे आता सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.



