ताज्या घडामोडी

दुय्यम निबंधक कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे असूनही कारभारावर प्रश्नचिन्ह!

सर्वसामान्य नागरिकांचे नंबर मागे, एजंटांना प्राधान्य मिळत असल्याच्या तक्रारी; दस्तलेखकांच्या शैक्षणिक पात्रतेचीही चौकशी करण्याची मागणी.भाग नं.१०

सांगोला : विशेष प्रतिनिधी

विकास गंगणे 

मो.9881583935

 

 

सांगोला येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील कामकाजाबाबत नागरिक आणि शेतकऱ्यांकडून विविध तक्रारी समोर येत आहेत. कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले असतानाही ते प्रत्यक्षात सुरू आहेत की बंद, याची तपासणी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. कार्यालयातील कामकाज पारदर्शक असावे, नागरिकांना समान वागणूक मिळावी आणि प्रत्येक व्यवहार नियमानुसार व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

कार्यालयात दस्त नोंदणीसाठी येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना रांगेत थांबावे लागत असल्याची तक्रार आहे. मात्र, काही एजंटांमार्फत आलेल्या दस्तांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. सामान्य नागरिकांचा नंबर मागे ठेवून एजंटांच्या माध्यमातून आलेल्या कामांना आधी संधी दिली जाते का, असा सवाल उपस्थित होत आहे. या प्रकारामुळे नागरिकांना तासनतास कार्यालयात थांबावे लागत असल्याचे सांगितले जाते.

 

कार्यालयात नागरिकांच्या सुविधेसाठी असलेले हिरकणी कक्ष नेमके कोणत्या उद्देशाने वापरले जात आहे, याचीही तपासणी व्हावी, अशी मागणी होत आहे. हा कक्ष महिलांसाठी व नागरिकांच्या सोयीसाठी आहे की त्याचा वापर इतर कामांसाठी होत आहे, याबाबत स्पष्टता आवश्यक आहे.

 

याशिवाय, कार्यालयातील काही दस्तांवर पक्षकारांच्या सह्यांबाबत आणि एजंटांच्या भूमिकेबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पक्षकार स्वतः उपस्थित असताना त्यांच्या सह्या नियमानुसार घेतल्या जातात का? दस्तातील मजकूर त्यांना समजावून सांगितला जातो का? तसेच दस्तलेखनाचे काम करणाऱ्या खासगी व्यक्तींची पात्रता व अनुभव तपासला जातो का, याची चौकशी होणे गरजेचे आहे.

 

विशेषतः खासगी दस्तलेखक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तींसाठी शासनाने निश्चित केलेली शैक्षणिक पात्रता कोणती आहे? दस्तलेखनासाठी किमान शिक्षणाची अट आहे का? संबंधित व्यक्तींकडे आवश्यक अनुभव, प्रशिक्षण किंवा अधिकृत परवानगी आहे का? काही व्यक्तींच्या शैक्षणिक पात्रतेबाबत शंका व्यक्त होत असल्याने त्यांच्या कागदपत्रांची नियमानुसार पडताळणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

 

▪️प्रशासनाने करावी सखोल चौकशी▪️

 

दुय्यम निबंधक कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कार्यस्थिती, नागरिकांना दिला जाणारा क्रमांक, दस्त नोंदणीतील प्राधान्यक्रम, एजंटांची भूमिका, हिरकणी कक्षाचा वापर, पक्षकारांच्या सह्या आणि खासगी दस्तलेखकांची शैक्षणिक पात्रता या सर्व बाबींची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निष्पक्ष चौकशी करावी. चौकशीत अनियमितता आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

 

शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना आपल्या जमिनीचे खरेदी-विक्री व्यवहार करण्यासाठी कोणाच्याही मध्यस्थीवर अवलंबून राहावे लागू नये. कार्यालयातील कामकाज पारदर्शक, वेळेत आणि शासनाच्या नियमांनुसार व्हावे. सीसीटीव्ही कॅमेरे केवळ नावापुरते न राहता त्यांचा प्रत्यक्ष उपयोग होतो का, हेही वरिष्ठ प्रशासनाने तपासावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. तसेच पत्रकार,राजकीय नेतेमंडळी लवकरच वरीष्ठ अधिकारी व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन सर्व कागदपत्रे सादर करणार.

▪️भाग नं.११ उद्या▪️

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??