ताज्या घडामोडी

वाढत्या चोऱ्या, गावागावांतील भांडणे आणि बेकायदेशीर धंद्यांबाबत नागरिकांमध्ये नाराजी; सांगोला पोलीस निरीक्षकांनी तातडीने लक्ष घालण्याची मागणी▪️भाग नं.४

सांगोला विशेष प्रतिनिधी : विकास गंगणे

मो.9881583935

 

घेरडी पोलीस बीटअंतर्गत येणाऱ्या विविध गावांमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर येत असल्याची चर्चा नागरिकांमधून होत आहे. काही गावांमध्ये भांडणाचे प्रकार घडत असताना संबंधित पोलिसांकडून वेळेवर प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. एखादी घटना घडल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन योग्य ती कारवाई करावी, या अपेक्षेने काही नागरिक संबंधित अधिकाऱ्यांना फोन करतात. मात्र फोन उचलला जात नसल्याने किंवा प्रतिसाद मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

 

घेरडी परिसरात अलीकडील काळात चोरीच्या घटनांचे प्रमाण वाढत असल्याची चिंता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. गावांमध्ये घरफोडी, चोरी तसेच इतर संशयास्पद हालचालींबाबत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याचे सांगितले जात आहे. अशा परिस्थितीत पोलिसांची नियमित गस्त, संशयित व्यक्तींवर लक्ष आणि तक्रारींवर तातडीने कार्यवाही होणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

 

दुसरीकडे, परिसरातील काही ठिकाणी बेकायदेशीर धंदे सुरू असल्याच्या तक्रारीही पुढे येत आहेत. या धंद्यांवर कारवाई करण्याऐवजी संबंधित यंत्रणेतील काही व्यक्तींकडून आर्थिक देवाणघेवाणीबाबत चर्चा होत असल्याचा आरोप नागरिकांमधून केला जात आहे. मात्र या आरोपांची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करणे गरजेचे आहे.

 

▪️सामान्य नागरिकांनी तक्रार करायची तरी कोणाकडे?▪️

 

एखाद्या गावात भांडण झाले, चोरी झाली किंवा बेकायदेशीर प्रकार सुरू असल्याचे निदर्शनास आले, तर नागरिकांनी पोलिसांकडे मदत मागणे अपेक्षित असते. परंतु तक्रार करण्यासाठी फोन करूनही प्रतिसाद मिळत नसेल, तर सर्वसामान्य नागरिकांनी न्यायासाठी कोणाकडे धाव घ्यायची, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी घेरडी पोलीस बीटच्या कामकाजाची प्रत्यक्ष माहिती घ्यावी. संबंधित अधिकारी नागरिकांचे फोन का घेत नाहीत, चोरीच्या घटनांवर कोणती कार्यवाही झाली, बेकायदेशीर धंद्यांबाबत आलेल्या तक्रारींची किती दखल घेतली, याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

 

पोलिसांचे काम केवळ तक्रार नोंदविण्यापुरते नसून नागरिकांना सुरक्षिततेचा विश्वास देणेही तितकेच महत्त्वाचे आहे.त्यामुळे घेरडी बीटअंतर्गत येणाऱ्या सर्व गावांमध्ये पोलिसांची गस्त वाढवून, नागरिकांच्या तक्रारींना वेळेत प्रतिसाद देऊन आणि दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

 

आता सांगोला पोलीस निरीक्षक या तक्रारींची कितपत दखल घेतात आणि घेरडी परिसरातील नागरिकांना सुरक्षिततेचा दिलासा मिळतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

▪️भाग ऩ.५ उद्या वाचा.▪️

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??