कडलास येथे बुलेट घसरून भीषण अपघात; गंभीर जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

सांगोला विशेष प्रतिनिधी : विकास गंगणे
मो.९८८१५८३९३५
सांगोला तालुक्यातील कडलास येथील मायाक्का मंदिराजवळील कॅनल परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 जी वर बुलेट मोटारसायकल घसरून झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सुजाता किसन काळे (वय 43, रा. सोनंद, ता. सांगोला) असे मृत महिलेचे नाव आहे.
पोलिसांत दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, दि. 25 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अनिल धोंडीराम काळे (वय 45, रा. सोनंद) हे सुजाता काळे यांना पाठीमागे बसवून रॉयल एनफिल्ड बुलेट (क्रमांक MH-45-BG-2701) वरून सोनंद येथून सांगोल्याकडे जात होते. यावेळी कडलास येथील मायाक्का मंदिराजवळील कॅनल परिसरात डांबरी रस्त्याच्या साईडपट्टीवरून बुलेट घसरून अपघात झाला.
या अपघातात पाठीमागे बसलेल्या सुजाता काळे यांच्या डोक्याला व हनुवटीला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर त्या बेशुद्ध अवस्थेत पडल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच त्यांचे कुटुंबीय घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांना तातडीने खासगी वाहनातून सांगोला येथील दक्षता हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी सोलापूर येथील सी.एन.एस. हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.
दरम्यान, दि. 27 ऑक्टोबर रोजी त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांचे प्रयत्न सुरू असतानाही दि. 28 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. दि. 29 ऑक्टोबर रोजी शवविच्छेदन झाल्यानंतर सोनंद येथे नातेवाईकांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
आईच्या निधनानंतर कुटुंबीयांनी अंत्यविधी व इतर धार्मिक विधी पूर्ण केले. त्यानंतर मुलगा संदीप किसन काळे (वय 25) यांनी दि. 21 नोव्हेंबर 2026 रोजी सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
फिर्यादीत बुलेट चालक अनिल धोंडीराम काळे यांनी वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवून रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्यामुळे अपघात झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या अपघातात सुजाता काळे यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी बुलेट चालकाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे सोनंद परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रस्त्यावरील वाहन चालविताना वेगावर नियंत्रण ठेवणे, रस्त्याच्या परिस्थितीकडे लक्ष देणे आणि सुरक्षिततेचे नियम पाळणे किती महत्त्वाचे आहे, हे या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे.



