गौडवाडीत शेतातील माती नेण्याच्या वादातून तरुणाला मारहाण; काठी, दगडाने हल्ला केल्याची फिर्याद

सांगोला विशेष प्रतिनिधी
विकास गंगणे
मो.9881583935
सांगोला तालुक्यातील गौडवाडी येथे बुध्याळ पाझर तलाव परिसरातील शेतातील माती नेण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका २९ वर्षीय तरुणाला मारहाण करून जखमी केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी आकाश सखाराम गडदे (वय २९, रा. गौडवाडी) यांनी दि. २४ नोव्हेंबर २०२६ रोजी सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादीत नमूद केल्यानुसार, आकाश गडदे हे ट्रॅव्हल्सवर चालक म्हणून काम करतात. बुध्याळ पाझर तलावासाठी शासनाकडे गेलेल्या त्यांच्या शेतजमिनीतील पाणीसाठा कमी झाल्याने त्यांनी त्या ठिकाणी ज्वारीची पेरणी केली होती. दि. २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ते शेतात काम करीत असताना त्यांच्या भावकीतील तिघेजण तेथे माती काढण्यासाठी आले होते.
यावेळी आकाश गडदे यांनी, आपल्या शेतात ज्वारीची पेरणी केली असल्याने या ठिकाणाहून माती नेऊ नये, दुसऱ्या बाजूने माती न्यावी, असे सांगितल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यावरून वाद निर्माण झाला. त्यानंतर बिरूदेव बाळू गडदे याने हाताने मारहाण केल्याचा, रामा हरिदास गडदे याने हातातील काठीने डाव्या हातावर तसेच दोन्ही पायांवर मारल्याचा, तर ओंकार बाळू गडदे याने हातातील दगडाने चेहऱ्यावर मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
या तिघांनी शिवीगाळ करून दमदाटी केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. भांडणाचा आवाज ऐकून फिर्यादीचे वडील सखाराम गडदे व भावाच्या मुलाने घटनास्थळी धाव घेत भांडण सोडविले. त्यानंतर जखमी आकाश यांनी खासगी दवाखान्यात उपचार घेतले. कामानिमित्त बाहेरगावी गेल्यानंतर ते २४ नोव्हेंबर रोजी सांगोला पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी हजर झाले. पोलिसांनी वैद्यकीय उपचारासाठी यादी दिल्यानंतर उपचार घेऊन त्यांनी पुन्हा पोलीस ठाण्यात येत फिर्याद दिली.
शेतजमिनीच्या हद्दीवरून आणि माती काढण्याच्या कारणावरून निर्माण झालेला हा वाद आता पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे. या प्रकरणात संबंधित तक्रारीची दखल घेऊन पोलिसांकडून पुढील कायदेशीर कार्यवाही काय केली जाते, याकडे गौडवाडी परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.



