घेरडी पोलीस औट पोस्टच्या इमारतीचा प्रश्न मान्य; मात्र नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष का?
फोनला प्रतिसाद नाही, फिर्यादीनंतरही विलंब होत असल्याची नागरिकांची तक्रार; पोलीस निरीक्षकांनी लक्ष घालण्याची मागणी {▪️भाग नं.७▪️}

सांगोला विशेष प्रतिनिधी : विकास गंगणे
मो.9881583935
घेरडी येथील पोलीस औट पोस्टची इमारत जीर्ण झालेली असून, त्या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांना नियमितपणे बसणे व कामकाज करणे शक्य होत नाही, ही वस्तुस्थिती नागरिकांनाही मान्य आहे. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना घेरडी परिसरात नियमित उपस्थित राहण्यात अडचणी येत असल्याचे समजून घेण्याची भूमिका नागरिकांनी घेतली आहे. मात्र, इमारतीची गैरसोय असली तरी नागरिकांच्या तक्रारी आणि सुरक्षेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होता कामा नये, अशी अपेक्षा महिला व नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
घेरडी बीट अंतर्गत येणाऱ्या काही गावांमध्ये भांडण-तंटे, वादविवाद किंवा इतर अनुचित प्रकार घडल्यास नागरिक पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात. मात्र, काही वेळा फोनला प्रतिसाद मिळत नसल्याची तसेच तक्रार दाखल केल्यानंतरही तातडीने कार्यवाही होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. फिर्याद दिल्यानंतर वेगवेगळी कारणे सांगून वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोपही काही नागरिकांकडून केला जात आहे.
दुसरीकडे, परिसरात काही बेकायदेशीर व्यवसाय सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. अशा प्रकारांवर कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून कितपत लक्ष दिले जाते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी वेळ मिळत नसेल, तर परिसरातील कथित बेकायदेशीर धंद्यांवर लक्ष ठेवण्यासाठी यंत्रणा कशी कार्यरत असते, असा सवालही नागरिक उपस्थित करीत आहेत. मात्र, या आरोपांची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करणे आवश्यक आहे.
▪️पोलीस निरीक्षकांनी लक्ष घालण्याची मागणी▪️
घेरडी औट पोस्टच्या जीर्ण इमारतीचा प्रश्न सोडविण्यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करणे, पोलीस कर्मचाऱ्यांची नियमित उपलब्धता सुनिश्चित करणे, नागरिकांचे फोन वेळेवर उचलणे आणि दाखल तक्रारींवर नियमानुसार तातडीने कार्यवाही करणे आवश्यक आहे. यासाठी सांगोला पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी विशेष लक्ष घालावे, अशी मागणी महिला व नागरिकांकडून होत आहे.
▪️अन्यथा आंदोलनाचा इशारा?▪️
नागरिकांच्या तक्रारींची दखल घेतली नाही आणि पोलीस प्रशासनाच्या कामकाजात सुधारणा झाली नाही, तर आंदोलन करण्याची भूमिका घ्यावी लागेल, अशी चर्चा परिसरातील नागरिकांमध्ये सुरू असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या विषयाकडे गांभीर्याने पाहून घेरडी बीटमधील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
आता घेरडी पोलीस औट पोस्टच्या इमारतीचा प्रश्न मार्गी लागणार का आणि नागरिकांच्या तक्रारींचे निवारण वेळेत होणार का, याकडे परिसरातील महिला व नागरिकांचे लक्ष लागले आहे.
{▪️भाग.नं.८ उद्या वाचा▪️}



