घेरडी बसस्थानकाचे काम कासव गतीने; प्रवाशांची गैरसोय कधी थांबणार?
बसस्थानकाचे काम जलद गतीने पूर्ण करण्याची महिला व प्रवाशांची मागणी

सांगोला विशेष प्रतिनिधी
विकास गंगणे
मो.9881583935
घेरडी (ता. सांगोला) येथील बसस्थानकाचे काम संथ गतीने सुरू असल्याने प्रवासी, महिला, विद्यार्थी तसेच वाहनचालकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. बसस्थानकाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून प्रवाशांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
घेरडी हे परिसरातील महत्त्वाचे वर्दळीचे ठिकाण असून येथे दर सोमवारी आठवडी बाजार भरतो. त्यामुळे या दिवशी परिसरातील अनेक गावांमधून नागरिक, शेतकरी, व्यापारी आणि महिला खरेदीसाठी येत असतात. मात्र, बसस्थानकाचे काम अपूर्ण असल्याने एसटी बस नेमकी कुठे थांबवायची, प्रवाशांनी कुठे थांबायचे आणि वाहनांची व्यवस्था कशी करायची, असा प्रश्न निर्माण होत आहे. बसची वाट पाहणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांची विशेष गैरसोय होत आहे.
बसस्थानकाची पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे एसटी चालकांनाही बस थांबवताना अडचणी येत आहेत. तसेच खासगी वाहनांची वर्दळ, प्रवाशांची गर्दी आणि आठवडी बाजाराच्या दिवशी होणारी वाहतूक यामुळे परिस्थिती अधिकच अडचणीची बनते.
विशेष म्हणजे घेरडी येथे जिल्हा परिषद गटाचे महत्त्वाचे केंद्र असून पोलीस औटपोस्टदेखील आहे. अशा महत्त्वाच्या ठिकाणी प्रवाशांसाठी अद्याप बसस्थानकाचे काम पूर्णत्वास गेलेले नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
संबंधित बांधकाम विभाग, एसटी महामंडळाचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन बसस्थानकाच्या कामाचा वेग वाढवावा. काम पूर्ण करण्यासाठी निश्चित कालमर्यादा ठरवावी आणि तोपर्यंत प्रवाशांना सुरक्षितपणे बसची वाट पाहता येईल, अशी तात्पुरती व्यवस्था करावी, अशी मागणी महिला, प्रवासी व वाहनधारकांकडून होत आहे.
घेरडीसारख्या वर्दळीच्या गावात बसस्थानकाची सुविधा ही केवळ गरज नसून प्रवाशांच्या सुरक्षिततेशी आणि सोयीशी निगडित बाब आहे. त्यामुळे प्रशासन आता तरी जागे होऊन बसस्थानकाचे काम जलद गतीने पूर्ण करणार का, असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.



