ताज्या घडामोडी

रोडरोमियोंच्या विरोधात मनसे आक्रमक; विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना मैदानात!

शाळेतील मुलींना त्रास देणाऱ्यांना कायद्याने धडा शिकवा; अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करू” — विठ्ठल शिंदे

सांगोला : विशेष प्रतिनिधी 

विकास गंगणे 

मो.9881583935

 

शाळा-महाविद्यालय परिसर, बसस्थानक तसेच प्रमुख रस्त्यांवर विद्यार्थिनींची छेडछाड, अश्लील कमेंट्स, पाठलाग व विनाकारण त्रास देणाऱ्या रोडरोमियोंविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आक्रमक झाली आहे. विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न गांभीर्याने घेत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष विठ्ठल शिंदे यांनी पोलिस प्रशासनाची भेट घेत निवेदन सादर केले.

 

शाळा-महाविद्यालय सुटण्याच्या वेळेत काही टवाळखोर तरुण परिसरात विनाकारण थांबून विद्यार्थिनींचा पाठलाग करणे, अश्लील शेरेबाजी करणे तसेच त्रास देण्याचे प्रकार करत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे रोडरोमियोंवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी विठ्ठल शिंदे यांनी निवेदनातून केली.

 

“विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. मुलींना त्रास देणाऱ्या रोडरोमियोंना कायद्याने धडा शिकवा. पोलिसांनी तातडीने कारवाई करून अशा टवाळखोरांना आळा घालावा. प्रशासनाने कारवाईकडे दुर्लक्ष केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना मनसे स्टाईल आंदोलन उभारेल,” असा इशारा तालुकाध्यक्ष विठ्ठल शिंदे यांनी दिला.

 

यावेळी शाळा व महाविद्यालय परिसरात पोलिसांची गस्त वाढवावी, विशेषतः विद्यार्थिनींच्या येण्या-जाण्याच्या वेळेत साध्या वेशातील पोलिसांची नियुक्ती करावी, अशी मागणीही करण्यात आली.

 

“मुलींनी शिक्षणासाठी घराबाहेर पडताना त्यांच्या पालकांना चिंता वाटू नये, यासाठी परिसर सुरक्षित असणे गरजेचे आहे. रोडरोमियोंची दहशत निर्माण होऊ देणार नाही,” असे विठ्ठल शिंदे, तालुकाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांनी स्पष्ट केले.

 

विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा मुद्दा पुढे नेत विठ्ठल शिंदे यांनी प्रशासनाला थेट इशारा दिल्याने आता पोलिस प्रशासन या रोडरोमियोंविरोधात कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??