ताज्या घडामोडी

दारू विक्री रोखण्याची जबाबदारी कुणाची? नागरिकांनाच अर्ज करण्याचा सल्ला!

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह?

सांगोला विशेष प्रतिनिधी

विकास गंगणे

मो.9881583935

 

सांगोला शहरासह तालुक्यातील विविध ग्रामीण भागांमध्ये बेकायदेशीर दारू व ताडी विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची चर्चा नागरिकांमधून होत आहे. काही ठिकाणी खुलेआम दारू आणि ताडी विक्री होत असल्याच्या तक्रारी असून, यामुळे ग्रामीण भागातील सामाजिक वातावरणावर विपरीत परिणाम होत असल्याची चिंता महिला व ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.

या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यपद्धतीवरही नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. संबंधित ठिकाणी अवैध दारू विक्री सुरू असल्याची माहिती दिल्यानंतरही प्रभावी कारवाई होत नसल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. काही नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित अधिकाऱ्यांकडून कारवाईसाठी अर्ज करा किंवा आमच्या विभागाकडे लेखी तक्रार द्या, असे सांगितले जाते. त्यामुळे प्रत्यक्ष कारवाई करण्याऐवजी तक्रारदारांवरच अर्ज करण्याची जबाबदारी टाकली जात असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे.

 

विशेषतः ग्रामीण भागातील महिला या प्रकारामुळे चिंतेत आहेत. अवैध दारू विक्रीमुळे काही कुटुंबांमध्ये आर्थिक अडचणी, कौटुंबिक वाद आणि सामाजिक समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जाण्याची शक्यता लक्षात घेता अशा विक्रीवर वेळीच नियंत्रण आणणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

 

अवैध दारू व ताडी विक्रीची माहिती मिळाल्यानंतर संबंधित विभागाने स्वतःहून तपासणी करून नियमानुसार कारवाई करणे अपेक्षित आहे. त्यासाठी प्रत्येक वेळी सामान्य नागरिकांनीच पुढाकार घेऊन अर्ज करावा, अशी परिस्थिती राहू नये. तक्रारदारांना त्रास होणार नाही, याचीही प्रशासनाने काळजी घेणे आवश्यक आहे.

 

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगोला तालुक्यातील अवैध दारू व ताडी विक्रीच्या प्रकारांची गांभीर्याने दखल घ्यावी. शहरासह ग्रामीण भागात अचानक तपासणी मोहीम राबवून दोषींवर नियमानुसार कठोर कारवाई करावी. संबंधित विभागाच्या कामकाजाचीही चौकशी करावी, अशी मागणी महिला व ग्रामस्थांकडून होत आहे.

 

आता राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वरिष्ठ अधिकारी या तक्रारींची दखल घेऊन प्रत्यक्ष कारवाई करणार का, की अवैध विक्रीचे प्रकार असेच सुरू राहणार, याकडे सांगोला तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??