पारे गावात चोरट्यांचा धुमाकूळ; बालाजी ज्वेलर्सचे शटर उचकटून सोन्या-चांदीवर डल्ला, घरफोडीतही लाखोंचा ऐवज लंपास!

सांगोला विशेष प्रतिनिधी
विकास गंगणे
मो.9881583935
सांगोला तालुक्यातील पारे गावात चोरट्यांनी धाडसी चोरीच्या दोन घटना घडवून आणल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. आज पहाटे सुमारे चार वाजण्याच्या दरम्यान चोरट्यांनी बालाजी ज्वेलर्स या सोन्या-चांदीच्या दुकानाचे शटर उचकटून दुकानातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याची घटना घडली. विशेष म्हणजे, दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे फिरवून चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
याचदरम्यान पारे गावातील रतनसिंग भिमसिंग साळुंखे यांच्या घरालाही चोरट्यांनी लक्ष्य केले. घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील दोन तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या, एकूण चार तोळे सोने, दहा तोळे चांदी आणि रोख चार हजार रुपये असा ऐवज चोरून नेल्याची माहिती मिळाली आहे.
एकाच पहाटेच्या सुमारास सोन्याच्या दुकानासह घरफोडीची घटना घडल्याने पारे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, रात्रीच्या गस्तीत वाढ करण्याची मागणी नागरिकांकडून होण्याची शक्यता आहे.
या चोरीच्या घटनांमागे कोणाचा हात आहे, चोरट्यांनी किती मुद्देमाल लंपास केला आणि दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये काही हालचाली कैद झाल्या आहेत का, याबाबत तपासातूनच स्पष्टता येणार आहे.

पारे गावातील या धाडसी चोरीच्या घटनांचा पोलिसांनी तातडीने तपास करून चोरट्यांचा शोध घ्यावा आणि चोरीस गेलेला मुद्देमाल परत मिळवून द्यावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.



