ताज्या घडामोडी

राज्य उत्पादन शुल्क विभागाचा कारभार चर्चेत; तालुक्यात एकाला तुपाशी, तर दुसऱ्याला उपाशी!

सांगोला विशेष प्रतिनिधी : विकास गंगणे

मो .9881583935

 

सांगोला तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारभाराबाबत सध्या विविध प्रश्न उपस्थित होत असून, बेकायदेशीर दारू व ताडी विक्रीवरील कारवाईत दुजाभाव केला जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. तालुक्यात काही ठिकाणी बेकायदेशीर दारू विक्री सुरू असल्याच्या तक्रारी होत असतानाही संबंधित विक्रेत्यांवर ठोस कारवाई होत नसल्याची नागरिकांची भावना आहे. दुसरीकडे, बेकायदेशीर ताडी विक्रेत्यांवर मात्र कारवाई केली जात असल्याचे चित्र दिसत असल्याने विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

 

विशेष म्हणजे, काही ताडी विक्रेत्यांना कारवाईचा सामना करावा लागत असताना काही ठिकाणी मात्र विक्री सुरूच असल्याची चर्चा आहे. एका विक्रेत्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, विभागाशी संबंधित काही कर्मचाऱ्यांना कथित मासिक हप्ता दिल्यास संबंधित विक्रेत्यांवर कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच विभागाकडून नेमण्यात आलेल्या झिरो कर्मचाऱ्यांच्या भूमिकेबाबतही संशय व्यक्त केला जात आहे.

 

मात्र, या कथित आर्थिक व्यवहारांना अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नसून, या आरोपांची संबंधित विभागाकडून चौकशी होणे आवश्यक आहे. अशा प्रकारचे व्यवहार होत असल्यास त्याची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

 

नवीन अधिकाऱ्यांसमोर पारदर्शक कारभाराचे आव्हान!

 

राज्य उत्पादन शुल्क विभागात नव्याने आलेले भोसले साहेब या संपूर्ण प्रकाराकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहणार, याकडे आता सांगोला तालुक्याचे लक्ष लागले आहे. तालुक्यातील बेकायदेशीर दारू व ताडी विक्रीवर समान निकष लावून कारवाई केली जाणार का? संबंधित कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची तपासणी होणार का? तसेच कथित हप्तेखोरीच्या आरोपांची चौकशी केली जाणार का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

 

महिलांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न ऐरणीवर

 

गावोगावी सुरू असलेल्या बेकायदेशीर दारू विक्रीमुळे अनेक कुटुंबांवर सामाजिक व आर्थिक परिणाम होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे महिला वर्ग आणि ग्रामस्थांकडूनही अवैध दारू विक्रीवर नियंत्रण आणण्याची मागणी होत आहे.

 

आता नूतन अधिकारी भोसले साहेब केवळ किरकोळ कारवायांपुरते मर्यादित न राहता तालुक्यातील सर्वच भागांतील अवैध दारू व ताडी विक्रीविरोधात समान पद्धतीने मोहीम राबवणार का? तसेच विभागाच्या नावाने सुरू असलेल्या कथित वसुलीच्या चर्चेला पूर्णविराम देण्यासाठी कोणती पावले उचलणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??