ताज्या घडामोडी

घेरडी पोलीस औट पोस्टची दुरवस्था; इमारतीला झाडाझुडपांचा विळखा! जिर्ण इमारतीमुळे पोलिस कर्मचाऱ्यांना काम करताना अडचणी

सांगोला विशेष प्रतिनिधी : विकास गंगणे

मो.9881583935

 

 

सांगोला तालुक्यातील घेरडी येथील पोलीस औट पोस्टची इमारत सध्या दुरवस्थेत असून, इमारतीच्या परिसरात झाडाझुडपांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. इमारतीची झालेली जिर्ण अवस्था आणि परिसरातील अस्वच्छतेमुळे येथे कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना तसेच विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

घेरडी हे सांगोला तालुक्यातील महत्त्वाचे गाव असून, जिल्हा परिषद गटाचे प्रमुख केंद्र म्हणूनही या गावाची ओळख आहे. गावाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असून, घेरडी परिसरात दररोज नागरिकांची आणि वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने येथील पोलीस औट पोस्टला विशेष महत्त्व आहे.

 

मात्र, अशा महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या पोलीस औट पोस्टच्या इमारतीची देखभाल आणि दुरुस्ती करण्याकडे संबंधित विभागाचे पुरेसे लक्ष आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. इमारतीच्या परिसरात झाडाझुडपांची वाढ झाल्याने कार्यालयाच्या परिसराला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. तसेच इमारतीची दुरवस्था झाल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना दैनंदिन कामकाज करताना गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे.

 

पोलीस कर्मचारी हे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी दिवसरात्र कर्तव्य बजावत असतात. मात्र, त्यांच्याच कामाच्या ठिकाणी आवश्यक सुविधा आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध नसल्यास कामकाजावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. पोलीस औट पोस्टमध्ये विविध तक्रारी, चौकशी तसेच इतर कामांसाठी येणाऱ्या नागरिकांनाही योग्य सुविधा मिळणे आवश्यक आहे.

 

त्यामुळे संबंधित पोलीस प्रशासन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेरडी पोलीस औट पोस्टच्या इमारतीची प्रत्यक्ष पाहणी करावी. परिसरातील झाडाझुडपे हटवून स्वच्छता करावी, इमारतीची आवश्यक दुरुस्ती करावी आणि इमारत वापरण्यास अयोग्य असल्यास नवीन इमारतीच्या प्रस्तावासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

 

जिल्हा परिषद गटाचे महत्त्वाचे केंद्र असलेल्या घेरडी गावातील पोलीस औट पोस्टला कधी मिळणार नवसंजीवनी? असा प्रश्न सध्या नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??