ताज्या घडामोडी

येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका एकत्रित लढवणार:

आमदार बाबासाहेब देशमुख आणि, दिपकआबा साळुंखे पाटील

 

सांगोला /विशेष प्रतिनिधी विकास गंगणे  मो.9881583935

 

 

सांगोला नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग 1 अ मधून राणीताई आनंदा माने आणि प्रभाग 11 अ मधून सुजाताताई चेतनसिंह केदार सावंत यांची बिनविरोध निवड झाली. या दोन्ही बिनविरोध नगरसेविकांचे आघाडीच्या वतीने आम्ही अभिनंदन करतो. जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मला, माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील, शिवसेनेचे शहाजीबापू पाटील, भाजपचे बाळासाहेब केदार, बाळासाहेब एरंडे यांसह सर्वांना विनंती केल्याने सांगोला शहर विकास आघाडीने समन्वयाची भूमिका घेतली त्यामुळेच या बिनविरोध निवडी शक्य झाल्या आहेत. त्यामुळे शहाजीबापू पाटील यांनी स्वतःची पाठ थोपटून या जागांचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये असा सज्जड इशारा सांगोला विधानसभेचे आमदार बाबासाहेब देशमुख आणि विधानपरिषदेचे माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी दिला. 

 

नागपूर येथील हिवाळी अधिवेशन संपवून मी आणि माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील आम्ही सांगोला शहर विकास आघाडीतील नेतेमंडळींना एकत्रित घेऊन लवकरच सांगोला येथे सविस्तर पत्रकार परिषद घेऊन आमची भूमिका स्पष्ट करणार आहोत असेही यावेळी आजी माजी आमदारांनी स्पष्ट केले. 

 

नगरपरिषद निवडणुकीच्या पूर्वीच जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगोला शहराच्या विकासासाठी सर्वांना एकत्रित येण्याची विनंती केले होती. यावेळी माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी पालकमंत्र्यांची विनंती धुडकावून लावली आणि निवडणूक प्रचारात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर युतीच्या सर्व मर्यादा सोडून एकेरी भाषेत टीका केली. आज तेच शहाजीबापू निवडणुकीचा निकाल जसा जवळ येऊ लागला तसतसे पालकमंत्र्यांचे गोडवे गात आहेत असेही आवर्जून आजी माजी आमदारांनी नमूद केले.

 

सध्या दोन्ही आजी माजी आमदार हे सांगोला तालुक्यातील विकासाच्या प्रश्नावर हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे उपस्थित आहेत. बिनविरोध निवडीच्या पार्श्वभूमीवर बोलताना आजी माजी आमदार म्हणाले, आगामी काळातही सांगोला तालुक्यातील निवडणुकांच्या दृष्टीने आमची आघाडी अभेद्यच राहणार आहे. शहाजीबापूंनी आमची चिंता करू नये. आज शहाजीबापू पाटील ज्या निर्णयामुळे स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत तोच निर्णय महिन्यापूर्वी त्यांनी घ्यायला हवा होता. सांगोला तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांवर सर्वांना एकत्रित येण्याची संधी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली होती. मात्र तेंव्हा त्यांना सांगोला तालुक्याची आणि शहराची नाही तर स्वतःची काळजी होती स्वतःच्या टक्केवारीचे दुकान सुरू ठेवण्यासाठी त्यांनी सांगोला शहरातील लोकांवर ही निवडणूक लादली. निवडणुकीच्या प्रचारात त्यांनी ज्यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली आज त्यांचेच कौतुक ते करत आहेत सांगोला नगरपालिकेचा निकाल जसा जवळ येत आहे तसा शहाजीबापू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहेत. वेळ येईल तशी भूमिका बदलणाऱ्या शहाजीबापूंना आता सांगोला शहर आणि तालुक्यातील जनतेने चांगलेच ओळखले आहे आगामी सर्व निवडणुकात आमची आघाडी कायम राहणार आहे आणि या निवडणुकात तालुक्यातील जनता राजकीय रंग आणि भूमिका बदलणाऱ्या शहाजीबापूंना त्यांची जागा दाखवून देईल असा विश्वासही शेवटी आमदार बाबासाहेब देशमुख आणि माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी व्यक्त केला. 

 

चौकट ; 

 

१) शहाजीबापूंना भाजपचे वावडे का ?

 

मी स्वतः पुरोगामी विचारांच्या शेतकरी कामगार पक्षाचा आमदार असताना आणि दिपकआबा कोणत्याही राजकीय पक्षात नसताना आम्हाला आमची व्यक्तिगत भूमिका बाजूला ठेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या विनंतीला मान देऊन सांगोला शहराच्या विकासासाठी भाजपसोबत जाण्यासाठी तयार झालो मात्र शहाजीबापू पाटील हे पूर्वीपासून महायुतीत असूनही त्यांना भारतीय जनता पार्टीचे एवढे वावडे कशासाठी आहे ? आम्ही दोघांनी शहराचे हित पाहिले आमचा स्वार्थ बघितला नाही.मात्र बापूंनी भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मारुती आबा बनकर यांना टोकाचा विरोध करून स्वतःचा स्वार्थ बघितला असेही यावेळी आमदार बाबासाहेब देशमुख आणि माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी स्पष्ट केले.

 

२) शेकाप आणि दिपकआबा हातात हात घालून सोबत राहणार

 

शांत आणि सुसंस्कृत सांगोला तालुक्यात स्व गणपतराव देशमुख आणि दिपकआबा साळुंखे पाटील यांनी अनेक वर्षे विकासाचे राजकारण केले होते. तीच परंपरा यापुढील काळात सुरू ठेऊन येणाऱ्या काळात शेतकरी कामगार पक्ष आणि माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील हे एकदिलाने हातात हात घालून सांगोला शहर आणि तालुक्यातील राजकारणात सोबत राहणार आहोत आणि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका एकत्रित लढवणार आहोत असा विश्वास यावेळी नागपूर येथून आजी माजी आमदारांनी व्यक्त केला.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??