आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली शेकापसोबत आघाडी करून लढवणार मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील कार्यकर्त्यांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी.

सांगोला /विशेष प्रतिनिधी
विकास गंगणे
मो.9881583935
सत्ता किंवा पदाच्या मागे मी लागणार नाही शेवटच्या श्वासापर्यंत पद असो किंवा नसो सांगोला तालुक्यातील जनतेची सेवा करत राहणार असा निर्धार मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केला मंगळवार दि.१६ डिसेंबर रोजी सांगोला येथे आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातून ते बोलत होते. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कामगार पक्ष सोबत आघाडी करून लढवणार असल्याचेही त्यांनी या कार्यकर्ता मेळाव्यातून स्पष्ट केले.
या कार्यकर्ता मेळाव्यास सांगोला शहर आणि तालुक्यातील कार्यकर्त्यांनी रेकॉर्डब्रेक गर्दी केली होती. या मेळाव्यास माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयमालाताई गायकवाड, तानाजीकाका पाटील, मधुकर बनसोडे, विजय येलपले, शिवाजी बनकर,
डॉ पियुष साळुंखे, ॲड यशराजे साळुंखे, अनिल खटकाळे, अनिल खडतरे, सोमनाथ लोखंडे, चंदन होनराव, शिवाजी कोळेकर, राज मिसाळ, विश्वनाथ चव्हाण, विजय पवार, चंद्रकांत चौगुले, योगेश खटकळे, सखुबाई वाघमारे, ॲड चैत्रजा बनकर माजी नगरसेविका पूजा पाटील सुनीता खडतरे यांच्यासह आजी माजी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य आणि नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
नुकत्याच पार पडलेल्या सगोला नगर परिषदेच्या निवडणुकीत गेली अनेक वर्ष आघाडीत लढलेल्या शेतकरी कामगार पक्ष आणि माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या गटाची पुन्हा एकदा जवळीक झाली आहे. सांगोला तालुक्यात गेली २५ ते ३० वर्षे ही आघाडी अबाधित होती. मध्यंतरी या आघाडीत बिघाडी झाली होती मात्र, पुन्हा एकदा सांगोला तालुक्यातील ही दोन प्रबळ राजकीय गट एकत्र आल्याने आता त्यांची ताकत चांगलीच वाढली आहे.
पुढे बोलताना माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील म्हणाले, सांगोला तालुक्यातील साळुंखे पाटील परिवारावर प्रेम आणि विश्वास असणारे तमाम नागरिक म्हणजे आमचे कुटुंब आहे. या कुटुंबाचा प्रमुख म्हणून नेहमीच कुटुंबाच्या हिताचा निर्णय घेण्याचा प्रयत्न करू आपल्या कुटुंबाचे हित कशात आहे हे मला इतरांनी शिकवण्याची गरज नाही. सध्या आम्ही कोणत्याच राजकीय पक्षात नसलो तरी लवकरच जे आमच्या कुटुंबाच्या मनात आहे तोच निर्णय मी घेईन असे सांगून माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी भाजप प्रवेशाचे संकेत दिले. ३५ वर्षे मी जनतेच्या प्रेम आणि विश्वासावर राजकीय जीवनात काम करत आहे युती किंवा आघाडीसाठी मी कधीच कुणाच्या दारात गेलो नाही त्यामुळे कुणी मला वगळून युती आणि आघाडी करण्याची भाषा करत असेल तर त्यांचा राजकीय पुनर्जन्म माझ्यामुळे झाला आहे हे त्यांनी विसरू नये असा इशाराही त्यांनी माजी आमदार शहाजीबापू पाटील यांना दिला.
माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्याविषयी बोलताना दिपकआबा म्हणाले, बापूंना नेहमीच एखाद्याला नादाला लावण्याची सवय आहे. नगरपालिका निवडणुकीत भाजपला नादी लावत त्यांनी स्वतः नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर केला. २०२४ ला विधानसभेचा उमेदवार तुम्हीच असे म्हणून मला सुद्धा त्यांनी ५ वर्षे नादाला लावले. आता त्यांनी स्वतःचा मुलाला सुद्धा सोडले नाही. महुद गटातून तुलाच उमेदवारी देतो म्हणून त्याला नादी लावले आता आरक्षणाचे कारण सांगून पद्धतशीरपणे त्याला गप्प बसवले आहे. शहाजीबापू पाटील यांच्या मुलाला मी माझ्या जवळा गटातून माझ्या स्वतःच्या मुलाला थांबवून जिल्हा परिषद सदस्य करेन फक्त त्यांनी कमळाचा चिन्हावर लढण्याची तयारी करावी अशी जाहीर ऑफरही या कार्यकर्ता मेळाव्यातून माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी दिली.
चौकट ;
१) काही दिवसातच तुम्हाला अपेक्षित निर्णय घेऊ
माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या भारतीय जनता पार्टीतील प्रवेशाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर या मेळाव्यातून ते याबाबत काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते यावर बोलताना लवकरच कार्यकर्त्यांच्या मनात जे आहे त्याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी चर्चा करून तसाच निर्णय घेऊ असे सूचक विधान करून भाजप प्रवेशाचे संकेत दिले आहेत.
२) कार्यकर्ता बैठकीस रेकॉर्डब्रेक मेळाव्याचे स्वरूप ; शहरातील ट्रॅफिक जाम
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी आयोजित केलेल्या प्राथमिक बैठकीस रेकॉर्डब्रेक गर्दी झाली हजारोंच्या संख्येने या मेळाव्यास कार्यकर्ते उपस्थित राहिल्याने सभागृहात जागा अपुरी पडल्याने शेकडो कार्यकर्ते सभागृहाच्या बाहेर बसण्याची वेळ आली एकच वेळी हजारो वाहने शहरात दाखल झाल्याने शहरातील ट्रॅफिक जाम झाले होते.



