ती’ ला मान-सन्मान देऊ या ! सौ.चंदनाताई आटपाडकर

सांगोला विशेष प्रतिनिधी
विकास गंगणे
मो.9881583938
खरं म्हटलं तर महिला दिन रोजच असतो. दररोज वेगवेगळ्या संकटांना ती तोंड देत असते. स्वतःचा संसार व्यवस्थितरित्या सांभाळत असते. ८ मार्च काय कधीच तिला तिच्या रोजच्या जीवनातून सुट्टी मिळत नाही. नित्य कष्ट हे तिचं जीवनच झालं आहे. त्यातूनही ती उंच भरारी घेऊन अग बाई बाई खरंच, बाई पण भारी, या उक्तीप्रमाणे तिने अनेक यशाची शिखर सर केली आहेत. नमन अशा तिच्या नारी शक्तीला. सहनशीलता, कष्ट, जिद्द, चिकाटी, मेहनत ही गुण तिच्या अंगी ठाई ठाई मुरलेली आहेत.
खरंच बाईचं जीवन अवघड आणि अवघडच आहे. कशाकशाची, तिच्या संसाराचा रगडा काट्याकुट्यातून पुढे नेत ती बिकट वाट चालत आहे. धन्य धन्य आहे तिचे जीवन, मुलं सुसंस्कृत बनवते, त्यांना योग्य प्रकारे शिक्षण देते, बालपणापासूनच त्यांच्यावर चांगले संस्कार घडवते, आपल्या पतीला चांगल्या-वाईट काळात साथ देते. कुठल्याही गोष्टीत आणि कशातही तिची तयारी असते. कधीच ती मागे सरकत नाही. कधी रडत नाही, कुडत नाही. प्रत्येकाला आपापल्या जागी मान देऊन तीही स्वतः ताट मानेने उभी असते.
खरंच बाई पण भारी
वाटतो तिलाच तिचा हेवा
संसाराचा रगडा स्वावलंबनावर पेलते
आपणही करावा तिचा आदर
सहनशक्तीची तिच्या करावी कदर
नारी शक्तीला सलाम सर्व अगोदर !!
देवाचे खरंच आभार मानायला पाहिजे. किती सर्वगुणसंपन्न तिला बनवले आहे. सुंदर पाककला, सुंदर जो पाहण्याची दृष्टी, जग पाहण्याची दृष्टी, सासर-माहेरचा आरसा असते नारी. तिचे विचार स्वतःच्या संसारासाठी खूप हितकारक असतात! आज तिनं पूर्ण विश्व व्यापल आहे. स्वतः सक्षम राहून अवध विश्व सक्षम बनवण्याची क्षमता तिच्यामध्ये असते. आपण सर्वांनी मिळून तिचा आदर-सत्कार करावा. तिला योग्य तो न्याय मिळावा. आज समाजातील घटना पाहता तिच्या मनाची किती कुचंबना होते हे लक्षात येते? तरीही खंबीरपणे सर्व गोष्टींना तोंड देऊन पुढे पुढे जात आहे. तिचे कष्ट पाहता वारंवार प्रणाम, नमस्कार, वंदन. आपण सर्वजण मिळून महिला दिन साजरा करूया आणि स्त्रीला योग्य तो न्याय देऊया !!
सौ.चंदनाताई आटपाडकर
डिकसळ ता सांगोला



