वाकीतील बेकायदेशीर ताडी विक्रीचा मुद्दा ऐरणीवर; उत्पादन शुल्क विभाग काय भूमिका घेणार?

सांगोला विशेष प्रतिनिधी | विकास गंगणे
सांगोला तालुक्यातील वाकी ( घेरडी) गावात बेकायदेशीर ताडी विक्री होत असल्याच्या मुद्द्यावरून संबंधित यंत्रणेच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. ताडी विक्रीसाठी आवश्यक परवाने आहेत का?, विक्री नियमानुसार सुरू आहे का आणि नियमांचे उल्लंघन होत असल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार का, असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन वस्तुस्थितीची पडताळणी करावी आणि नियमभंग आढळल्यास योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
हा ताडी विक्रेता वाकी गावात स्व:ताच बेकायदेशीर विक्री करत असून त्यानंतर सांगोला, खर्डी, पंढरपूर, गोपाळपूर तसेच मंगळवेढा तालुक्यातील भोसे, हुन्नूर आणि नंदेश्वर परिसरातील ताडी विक्रीसाठी पुरवतो.या व्यवहारांचीही संबंधित विभागाने तपासणी करावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. या परिसरात ताडीची विक्री नेमकी कोणत्या परवान्याअंतर्गत सुरू आहे, विक्रीची ठिकाणे अधिकृत आहेत का आणि परवान्याच्या अटींचे पालन केले जाते का, याची चौकशी होणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
परवान्यांची तपासणी करून कारवाई करणार का?
महाराष्ट्रात मद्यनिर्मिती, वाहतूक, साठवणूक आणि विक्री यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे नियंत्रण असते. संबंधित कायदे व नियमांनुसार आवश्यक परवानगीशिवाय मद्यविक्री केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्यामुळे वाकी गावासह नमूद परिसरातील ताडी विक्रीबाबत तक्रारी प्राप्त झाल्यास त्यांची प्रत्यक्ष तपासणी करून संबंधित परवान्यांची पडताळणी करणे महत्त्वाचे ठरणार आहे.
केवळ तक्रारींच्या आधारे कोणालाही दोषी ठरवता येणार नसले, तरी तक्रारींची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणणे ही प्रशासनाची महत्त्वाची जबाबदारी आहे. नियमबाह्य विक्री आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई व्हावी, तसेच अधिकृत विक्री सुरू असल्यास त्याबाबतही स्पष्टता द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
शुल्क विभागाच्या भूमिकेकडे लक्ष
वाकी गावातील कथित बेकायदेशीर ताडी विक्रीबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी कोणती भूमिका घेतात, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे. संबंधित गावांमध्ये प्रत्यक्ष पाहणी, परवान्यांची तपासणी आणि आवश्यकतेनुसार पोलिस व महसूल प्रशासनाच्या समन्वयातून कारवाई करावी, अशी मागणी पुढे येत आहे.



