हंगिरगे-गावडेवाडी परिसरात अवैध वाळू वाहतुकीची चर्चा; महसूल विभागाच्या कारवाईकडे ग्रामस्थांचे लक्ष!

सांगोला विशेष प्रतिनिधी : विकास गंगणे
मो.9881583935
सांगोला तालुक्यातील हंगिरगे आणि गावडेवाडी परिसरात बेकायदेशीर वाळू वाहतूक सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. मंगळवेढा तालुक्यातून जत तालुक्याच्या दिशेने वाळूची वाहतूक होत असल्याचे बोलले जात असून, या मार्गावरील वाळू वाहतुकीची महसूल विभागाने गांभीर्याने दखल घेण्याची मागणी होत आहे.
वाळू उपशासाठी शासनाने विविध नियम व अटी निश्चित केलेल्या असताना, विनापरवाना वाळू वाहतूक होत असल्यास त्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी महसूल विभागाची आहे. मात्र, हंगिरगे-गावडेवाडी परिसरातून अशी वाहतूक होत असल्याची चर्चा असताना संबंधित यंत्रणेकडून नेमकी कोणती तपासणी केली जात आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हंगिरगे तलाठी कार्यालयाच्या हद्दीत वाळू वाहतुकीवर लक्ष ठेवले जात आहे का? रात्रीच्या वेळी होणाऱ्या संभाव्य वाहतुकीची तपासणी केली जाते का? वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांकडे अधिकृत परवाने आणि वाहतूक पास आहेत का? याची प्रत्यक्ष पडताळणी करण्याची गरज आहे.
महसूल विभागाने केवळ कागदोपत्री नोंदी न ठेवता प्रत्यक्ष क्षेत्रात उतरून तपासणी करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. विनापरवाना वाहतूक आढळल्यास संबंधित वाहनांवर नियमानुसार कारवाई करावी. तसेच वाळूचा स्रोत, वाहतुकीचा मार्ग आणि संबंधित परवान्यांची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.
या प्रकरणात हंगिरगे तलाठी नेमकी कोणती भूमिका बजावत आहेत? मंडळ अधिकारी आणि तहसीलदार यांनी या परिसराची अचानक पाहणी केली आहे का? याबाबत महसूल प्रशासनाने वस्तुस्थिती स्पष्ट करणे आवश्यक आहे.
अवैध वाळू वाहतुकीबाबत सुरू असलेल्या चर्चेची सत्यता तपासून प्रशासनाने पारदर्शक माहिती द्यावी. दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.



