महाराष्ट्राच्या राजकारणात प्रामाणिकपणा,म्हणजे कै.स्व.गणपराव देशमुख.

सांगोला विशेष प्रतिनिधी
विकास गंगणे
मो.९८८१५८३९३५
एक झेंडा, एक पक्ष, एक मतदारसंघ… तत्त्वनिष्ठ राजकारणाचा अखेरचा दीपस्तंभ : स्व. गणपतराव (आबासाहेब) देशमुख
साधी राहणी, स्वच्छ चारित्र्य आणि जनतेप्रती अखंड निष्ठा यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात अजरामर ठरलेले लोकनेते*
महाराष्ट्राच्या राजकारणात प्रामाणिकपणा, तत्त्वनिष्ठा आणि जनसेवा या मूल्यांचा उल्लेख झाला की सर्वप्रथम ज्यांचे नाव आदराने घेतले जाते, ते म्हणजे स्वर्गीय गणपतराव अण्णासाहेब देशमुख (आबासाहेब). सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पेनूर येथे १० ऑगस्ट १९२६ रोजी जन्मलेल्या या थोर नेत्याने आयुष्यभर सत्तेपेक्षा समाजकारणाला प्राधान्य दिले. शेतकरी कामगार पक्षाच्या विचारधारेवर अखेरच्या श्वासापर्यंत निष्ठा ठेवत त्यांनी “एक पक्ष, एक मतदारसंघ, एक विचार” ही ओळख कायम राखली.
१९६२ मध्ये सांगोला विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडून आल्यानंतर तब्बल ५४ वर्षे त्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक विक्रम आपल्या नावावर नोंदवले. एकाच मतदारसंघातून सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा मान मिळवत त्यांनी भारतीय राजकारणात स्वतंत्र स्थान निर्माण केले. केवळ १९७२ आणि १९९५ या दोन निवडणुकांमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला; मात्र जनतेच्या विश्वासात कधीच तडा गेला नाही.
आबासाहेबांचे राजकारण हे सत्तेसाठी नव्हते, तर समाजहितासाठी होते. १९७८ ते १९८० या काळात पुलोद सरकारमध्ये कृषी, ग्रामविकास आणि न्याय खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर १९९९ ते २००२ या कालावधीत पणन व रोजगार हमी मंत्री म्हणूनही त्यांनी प्रभावी कामगिरी बजावली. विधानसभा हंगामी अध्यक्ष म्हणूनही त्यांनी सभागृहाचे कामकाज संयमाने आणि निष्पक्षपणे चालविले.
त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वात मोठा पैलू म्हणजे त्यांचा साधेपणा. “लालपरीचा आमदार” म्हणून ओळख मिळालेल्या आबासाहेबांनी आयुष्यभर राज्य परिवहन महामंडळाच्या बसने प्रवास केला. मंत्रीपदावर असतानाही त्यांनी शासकीय बंगल्याची अनावश्यक रंगरंगोटी केली नाही, नवे फर्निचर घेतले नाही. सरकारी कामासाठी येणारी वृत्तपत्रे रद्दीत विकून त्यातून मिळणारी रक्कमही सरकारी तिजोरीत जमा करण्याइतका प्रामाणिकपणा त्यांच्या आचरणात होता.
सांगोला तालुक्याच्या विकासासाठी त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. दुष्काळी भागात फळबागा, जलसंधारण, पाणलोट विकास आणि शेतीसाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून त्यांनी तालुक्याच्या विकासाला नवी दिशा दिली. शेतकरी, कामगार, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला.
पुण्यात शिक्षण घेत असताना शंकरराव मोरे आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव पडला. वकिलीचे शिक्षण पूर्ण करूनही त्यांनी जनसेवेचा मार्ग स्वीकारला. विधानसभेतील त्यांच्या पहिल्याच भाषणाचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी कौतुक केले होते. अभ्यासू, संयमी आणि मुद्देसूद वक्ता म्हणून त्यांची संपूर्ण राज्यात वेगळी ओळख निर्माण झाली.
२०१९ मध्ये प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी निवडणूक लढवली नाही. त्यानंतर त्यांच्या राजकीय वारशाची धुरा नातू डॉ. अनिकेत देशमुख यांनी स्वीकारली. ३० जुलै २०२१ रोजी सोलापूर येथील अश्विनी रुग्णालयात आबासाहेबांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक तत्त्वनिष्ठ, अभ्यासू आणि जनतेचा खरा लोकनेता गमावला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले.
आजच्या बदलत्या राजकारणात स्व. गणपतराव (आबासाहेब) देशमुख यांचे जीवन हे जनप्रतिनिधींसाठी आदर्श आहे. सत्तेचा मोह न बाळगता जनतेची सेवा, प्रामाणिकपणा आणि तत्त्वांशी तडजोड न करण्याचा त्यांचा वारसा पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील. म्हणूनच महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात त्यांचे नाव कायम आदराने आणि अभिमानाने स्मरणात राहील.

लेखन: तुकाराम भुसनर सर
मा.ग्राप.सदस्य डिकसळ ता.सांगोला



