म्हैसाळचे पाणी डिकसळच्या दारात, तरी वाड्यावस्त्या तहानलेल्या; माजी सरपंच तुकाराम भुसनर शेतकऱ्यांसाठी सरसावले

सांगोला विशेष प्रतिनिधी
विकास गंगणे
मो.9881583935
ऐन दुष्काळाच्या काळात सांगोला तालुक्यातील डिकसळ गावातील वाड्यावस्त्यांवरील शेतकऱ्यांसमोर पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचा लाभ क्षेत्रात असूनही अपेक्षित पाणी मिळत नसल्याची भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. डिकसळकरांच्या या प्रश्नाकडे संबंधित विभागाने तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून डिकसळसह सांगोला तालुक्यातील काही गावांना सिंचनाचा लाभ देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. उपलब्ध माहितीनुसार डिकसळ, पारे, हबिसेवाडी, नराळे, हंगिरगे, घेरडी आणि गावडेवाडी या गावांच्या हजारो हेक्टर क्षेत्राला योजनेच्या वितरिकेतून सिंचनाचा लाभ अपेक्षित आहे. मात्र, प्रत्यक्षात वाड्यावस्त्यांपर्यंत पाणी पोहोचताना अडचणी निर्माण होत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.काही भाग पाण्यापासून वंचित असून, त्या ठिकाणी सर्वे ही झालेला आहे,
परंतु त्या वाड्यावस्त्यावर परिस्थिती बिकट आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाचे विश्वासू समर्थक तथा डिकसळचे माजी सरपंच तुकाराम भुसनर हे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी पुढे सरसावले आहेत. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागू नये आणि उपलब्ध सिंचन योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळावा, यासाठी संबंधित यंत्रणेने परिस्थितीची पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पुढे येत आहे.
‘पाणी योजना आहे, मग शेतकरी तहानलेला का?’ असा सवाल डिकसळ परिसरातील शेतकऱ्यांमध्ये उपस्थित केला जात आहे. योजनेचे पाणी उपलब्ध असतानाही त्याचे योग्य नियोजन, पुरेसा दाब आणि वितरणातील अडचणी दूर झाल्या नाहीत तर दुष्काळाच्या काळात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे, सांगोला तालुक्यातील म्हैसाळ योजनेच्या शेवटच्या गावांना कमी दाबाने पाणी मिळत असल्याचा प्रश्न यापूर्वी विधानसभेतही उपस्थित झाला होता. आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी या गावांना पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली होती आणि त्यावर जलसंपदा विभागाकडून कार्यवाहीचे आश्वासन देण्यात आले होते.
त्यामुळे डिकसळ गावातील वाड्यावस्त्यांच्या सद्यस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून पाण्याचा दाब, वितरण व्यवस्था, आवश्यक आवर्तन आणि तांत्रिक अडचणी यांची तातडीने तपासणी करण्याची गरज आहे. ऐन दुष्काळात शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे नुकसान होऊ नये, यासाठी म्हैसाळ योजनेच्या पाण्याचा योग्य पद्धतीने लाभ मिळणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी डिकसळच्या या प्रश्नाकडे वेळीच लक्ष देऊन संबंधित जलसंपदा अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना द्याव्यात आणि वाड्यावस्त्यांपर्यंत सर्वे झाला असून त्या ठिकाणी पाण्याची कॉक ची गरज आहे. तर काही ठिकाणी वाड्यावस्त्यावर पुरेशा दाबाने पाणी पोहोचण्यासाठी ठोस कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. माजी सरपंच तुकाराम भुसनर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी पुढाकार घेतल्याने आता या प्रश्नावर प्रशासनाकडून काय कार्यवाही होते, याकडे डिकसळकरांचे लक्ष लागले आहे.



