ताज्या घडामोडी

दुष्काळातही प्रवाशांना हेलपाटे; सांगोला एसटी आगाराच्या संपर्क व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह!

सांगोला विशेष प्रतिनिधी 

विकास गंगणे 

मो.9881583935

 

सांगोला : सांगोला एसटी आगाराशी संबंधित कामांसाठी प्रवाशांना आगार प्रमुख अंकुश सरगर यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधण्याची आवश्यकता भासते. मात्र, अनेक वेळा फोनवर संपर्क होत नसल्याने प्रवाशांची कामे रखडत असून, संबंधित कामासाठी प्रत्यक्ष आगारात हेलपाटे मारावे लागत असल्याची प्रवाशांची तक्रार आहे. विशेषतः दुष्काळाच्या परिस्थितीत ग्रामीण भागातील प्रवाशांना वारंवार सांगोला आगारात ये-जा करावी लागत असल्याने वेळ आणि आर्थिक खर्चाचा अतिरिक्त भार सहन करावा लागत असल्याचे बोलले जात आहे.

 

प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, आगाराशी संबंधित चौकशी, पास, तिकीट, बससेवा अथवा इतर कामांसाठी दूरध्वनीवरून माहिती मिळणे अपेक्षित असताना संपर्क न झाल्यामुळे अनेकांना प्रत्यक्ष आगार गाठावे लागते. त्यातही संबंधित अधिकाऱ्यांकडून समाधानकारक माहिती किंवा उत्तर मिळत नसल्याची नाराजी काही प्रवाशांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे सांगोला एसटी आगाराच्या प्रशासकीय कामकाजावर नेमके नियंत्रण कोणाचे? असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.

 

एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी संपर्क व्यवस्था उपलब्ध करून दिली असेल, तर ती प्रत्यक्षात कार्यक्षम आहे का, प्रवाशांच्या फोनला प्रतिसाद का मिळत नाही आणि तक्रारींचे निराकरण कोणत्या पातळीवर केले जाते, याची संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासणी करणे गरजेचे असल्याची मागणी होत आहे. प्रवाशांना माहिती आणि सेवेसाठी वारंवार आगारात हेलपाटे मारावे लागू नयेत, यासाठी सक्षम संपर्क व्यवस्था आणि जबाबदार अधिकारी निश्चित करावेत, अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??