जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत डिकसळ आश्रमशाळेचा झेंडा; मुलींच्या दोन्ही संघाची जिल्ह्यात बाजी

सांगोला विशेष प्रतिनिधी
विकास गंगणे
मो.९८८१५८३९३५
जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत सांगोला तालुक्यातील डिकसळ येथील प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेच्या मुलींनी दमदार कामगिरी करत दोन गटांत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. १४ वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने तसेच १७ वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने बार्शी तालुक्यातील चारे गावात कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक, उच्च माध्यमिक हायस्कूल येथे जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळवत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.
जिल्हास्तरीय स्पर्धेत विविध शाळांमधून आलेल्या संघांमध्ये चुरशीच्या लढती झाल्या. डिकसळ आश्रमशाळेच्या खेळाडूंनी उत्कृष्ट सांघिक खेळ, सातत्यपूर्ण सराव, आत्मविश्वास आणि जिद्दीच्या जोरावर अंतिम टप्प्यापर्यंत मजल मारली. दोन्ही वयोगटातील संघांनी आपल्या खेळातील कौशल्य दाखवत प्रतिस्पर्धी संघांना कडवी झुंज दिली.
१४ वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने आणि १७ वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक मिळवणे ही आश्रमशाळेसाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. ग्रामीण व आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा कौशल्याला वाव मिळाल्यास ते जिल्हा तसेच राज्य पातळीवरही चमकदार कामगिरी करू शकतात, हे या यशातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
या यशाबद्दल दोन्ही संघातील खेळाडू, क्रीडा शिक्षक संतोष करांडे सर , संजय पाटील सर, मुख्याध्यापिका बाबर मॅडम, आश्रम शाळेचे मुख्याध्यापक यादव सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले .मार्गदर्शक तसेच आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन होत आहे. विद्यार्थिनींच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे डिकसळ गावासह सांगोला तालुक्याच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जिद्द, मेहनत आणि सांघिक खेळाच्या जोरावर जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या या विद्यार्थिनी भविष्यात विभागीय व राज्यस्तरीय स्पर्धेतही उल्लेखनीय कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त होत आहे.



