ताज्या घडामोडी

हक्काच्या म्हैसाळच्या पाण्यासाठी डिकसळकरांचा संघर्ष; जत तालुक्यातील अडवणुकीच्या तक्रारींमुळे शेतकरी आक्रमक!

वायफळच्या कॅनलवरती धरणे आंदोलन; संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी, आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या भूमिकेकडे लक्ष

सांगोला विशेष प्रतिनिधी

विकास गंगणे

मो.9881583935

 

डिकसळ, ता. सांगोला : सांगोला तालुक्यातील डिकसळ गावच्या शेतकऱ्यांना म्हैसाळ योजनेचे हक्काचे पाणी मिळावे, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी वायफळच्या कॅनलवरती येथे धरणे आंदोलन केले. म्हैसाळ योजनेचे पाणी उपलब्ध असतानाही डिकसळच्या शेतकऱ्यांना अपेक्षित पाणी मिळण्यात अडचणी येत असल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून केली जात आहे. जत तालुक्यातील काही शेतकऱ्यांकडून पाणी अडवले जात असल्याचीही तक्रार पुढे येत असून, यामुळे डिकसळकरांच्या हक्काच्या पाण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

 

शेतीसाठी पाणी हा शेतकऱ्यांच्या जगण्याचा महत्त्वाचा आधार आहे. पाण्याअभावी पिकांचे नुकसान होण्याची भीती असताना हक्काचे पाणी मिळवण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ डिकसळच्या शेतकऱ्यांवर आल्याने नाराजी व्यक्त होत आहे. म्हैसाळ योजनेच्या पाणीवाटपाचे नियोजन नेमके कसे केले जाते, डिकसळच्या शेतकऱ्यांना पाणी मिळण्यात अडथळे का निर्माण होत आहेत. आणि या तक्रारींची वस्तुस्थिती काय आहे, याची संबंधित विभागाने तातडीने तपासणी करणे आवश्यक आहे.

 

अधिकारी लक्ष घालणार का?

 

डिकसळच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन म्हैसाळ प्रकल्प विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करावी, पाणीवाटपातील अडचणी दूर कराव्यात आणि डिकसळला नियोजनानुसार पाणी उपलब्ध करून देण्यासाठी ठोस कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे. केवळ आश्वासनांवर प्रश्न न सोडवता पाणी कधी मिळणार, किती मिळणार आणि त्यासाठी कोणती कार्यवाही होणार, याबाबत स्पष्ट भूमिका मांडण्याची गरज आहे.

 

आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख काय भूमिका घेणार?

 

डिकसळच्या शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर तालुक्याचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख कोणती भूमिका घेतात, याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणे, पाणीवाटपातील अडथळ्यांचा आढावा घेणे आणि डिकसळकरांना हक्काचे पाणी मिळण्यासाठी पाठपुरावा करणे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

 

दरम्यान, आंदोलनानंतर संबंधित विभागाकडून कोणती कार्यवाही केली जाते आणि डिकसळच्या शेतकऱ्यांना प्रत्यक्षात पाणी मिळते का, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे. डिकसळकरांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळणार की पाण्यासाठीचा संघर्ष असाच सुरू राहणार, हा प्रश्न सध्या अनुत्तरित आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??