सांगोला पोलीस ठाण्यात डी.बी. पथक आहे की नाही?
ग्रामीण भागातील दारू विक्रेत्यांकडून कथित ‘मंथली हप्ते’ वसुलीच्या आरोपांची चौकशी करण्याची नागरिकांची मागणी. ▪️भाग नं.१▪️

सांगोला : विशेष प्रतिनिधी
विकास गंगणे
मो.9881583935
सांगोला पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात डी.बी. (डिटेक्शन ब्रँच) पथक कार्यरत आहे किंवा नाही, याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू असून, या पथकाच्या नावाचा किंवा संबंधित कर्मचाऱ्यांचा वापर करून ग्रामीण भागातील दारू विक्रेत्यांकडून कथितरीत्या ‘मंथली हप्ते’ घेतले जात असल्याचे आरोप तालुक्यातील काही भागांतून केले जात आहेत.
काही नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित पोलीस यंत्रणेशी थेट संबंध नसलेल्या काही व्यक्ती किंवा कथित एजंटांच्या माध्यमातून दारू विक्री करणाऱ्यांशी संपर्क साधला जात असल्याची चर्चा आहे. अशा व्यक्तींच्या सांगण्यावरून काही ठिकाणी नियमित रक्कम देण्याचा दबाव असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे, सांगोला पोलीस ठाण्यात डी.बी. पथकाची अधिकृत रचना, त्यातील कर्मचारी आणि त्यांच्याकडे सोपविण्यात आलेली नेमकी जबाबदारी काय आहे, याबाबत स्पष्टता होणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. पोलीस यंत्रणेच्या नावाचा गैरवापर करून कोणाकडून आर्थिक मागणी केली जात असेल, तर त्याची स्वतंत्रपणे चौकशी होणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
दारू विक्रीसंदर्भातील कारवाई ही कायद्यानुसार पारदर्शक पद्धतीने होणे अपेक्षित आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने पोलिसांच्या नावाने अथवा कोणत्याही अधिकृत पदाचा उल्लेख करून पैसे मागितल्यास त्याची सत्यता तपासणे आणि दोष आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करणे आवश्यक आहे.
या पार्श्वभूमीवर, सांगोला पोलीस ठाण्यात डी.बी. पथक अस्तित्वात आहे किंवा नाही, असल्यास त्यामध्ये कोण अधिकारी-कर्मचारी कार्यरत आहेत, त्यांना कोणती जबाबदारी देण्यात आली आहे आणि ग्रामीण भागात अशा प्रकारच्या आर्थिक मागण्यांबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत का, याची संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
दरम्यान, कथित हप्तेवसुलीचे आरोप खरे असल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी आणि आरोप तथ्यहीन असल्यास वस्तुस्थिती जनतेसमोर स्पष्ट करावी, अशीही नागरिकांची अपेक्षा आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष देऊन पारदर्शक चौकशी करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
भाग.नं.२ उद्या पहा.



