तिप्पीहाळी कॅनॉलजवळ मध्यरात्री गोळीबार; प्रतापसिंह ऊर्फ गब्बर करचे यांचा खून
सांगोला पोलिसांत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल; पिस्टलचा वापर, पोलीस निरीक्षक देशपांडे यांच्याकडे तपास

सांगोला विशेष प्रतिनिधी : विकास गंगणे
सांगोला तालुक्यातील तिप्पीहाळी येथील कॅनॉल परिसरात सोमवार, दि. २७ ऑक्टोबर २०२६ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबार करून प्रतापसिंह ऊर्फ गब्बर ज्ञानू करचे (वय ३२, रा. पाचेगाव बु., ता. सांगोला) यांचा खून केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मयताच्या पत्नी अर्चना करचे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सांगोला पोलीस ठाण्यात दोन संशयित आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, दि. २७ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे १.४६ ते १.५८ या वेळेत प्रतापसिंह ऊर्फ गब्बर करचे हे सांगोला येथून किडेबिसरीच्या दिशेने जात होते. ते वाहन चालवत असताना तिप्पीहाळी येथील कॅनॉलजवळ पाठीमागून त्यांच्या डोक्याच्या उजव्या बाजूस पिस्टलमधून गोळ्या झाडण्यात आल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
या प्रकरणी बालाजी ऊर्फ हर्षवर्धन नामदेव ऐवळे आणि विकी शिवाजी घेरडे, दोघेही रा. किडेबिसरी, ता. सांगोला, यांच्याविरुद्ध संगनमत करून खून केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १०४३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेचे कलम १०३(१), ३(५) तसेच शस्त्र अधिनियमाचे कलम ३ व २५ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक देशपांडे यांच्याकडे
या गुन्ह्याची नोंद सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघे यांनी केली असून, वरिष्ठांच्या आदेशानुसार पुढील तपास पोलीस निरीक्षक देशपांडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. घटनेमागील नेमके कारण काय, गोळीबारात वापरण्यात आलेल्या पिस्टलबाबतची माहिती आणि गुन्ह्यातील इतर बाबींचा तपास पोलीस करत आहेत.
या घटनेमुळे सांगोला तालुक्यात खळबळ उडाली आहे. मात्र, खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांच्या तपासातून पुढील माहिती समोर येण्याची शक्यता आहे.



